अकलूज गर्भलिंगनिदान प्रकरण; डॉक्टरला वाचवण्यासाठी पोलिसांच्या नावावर २५ लाखांची लाच!

अकलूज : सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे गाजलेल्या गर्भलिंगनिदान चाचणीच्या रॅकेटच्या प्रकरणाला आता एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर वळण लागले आहे. या प्रकरणातील संशयित डॉक्टर दांपत्याला अटक न करण्यासाठी आणि कठोर कलमे न लावण्यासाठी थेट पोलिसांच्या नावाने तब्बल २५ लाखांची लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पुणे पथकाने शुक्रवारी माळशिरस-पिलीव मार्गावर सापळा रचून साडेपाच लाखांची लाच स्वीकारताना दोन दलालांना रंगेहाथ पकडले. या धडक कारवाईमुळे अकलूज पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून, उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांसह काही पोलीस कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नेमकी काय आहे गर्भलिंगनिदान कारवाईची पार्श्वभूमी?
अकलूज पोलिसांनी १८ ऑगस्ट रोजी एका बनावट (डमी) रुग्णाला पाठवून एका गर्भलिंगनिदान चाचणीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. कारवाईदरम्यान आरोपी डॉक्टरांनी पोलिसांना शिवीगाळ करत अंगावर गाडी घालून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता आणि याप्रकरणी अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात डॉक्टर दांपत्याला अटक टाळण्यासाठी आणि ‘पीसी अँड पीएनडीटी’ (PC & PNDT) कायद्याची कलमे न लावण्यासाठी पोलिसांच्या वतीने मोठी लाच मागितल्याचा आरोप समोर आला.
२५ लाखांची डील आणि ५.५ लाखांची लाच घेताना दलाल जाळ्यात
तक्रारीनुसार, पोलिस हवालदार अनिल महादेव शिंदे याने मध्यस्थी करत यापूर्वीच १० लाख रुपयांची लाच स्वीकारली होती. त्यानंतर उर्वरित रकमेसाठी तडजोड सुरू होती. गुन्ह्यातील तपास अधिकारी तथा उपविभागीय पोलिस अधिकारी (DySP) संतोष वाळके यांच्यासाठी २५ लाख आणि स्वतःसाठी ५ लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणी त्रस्त व्यक्तीने २१ ऑगस्ट रोजी एसीबीकडे तक्रार दाखल केली. पडताळणी केल्यानंतर शुक्रवारी (२९ ऑगस्ट) माळशिरस-पिलीव मार्गावरील पुलाखाली सापळा रचण्यात आला. यादरम्यान, पोलिस उपअधीक्षक संतोष वाळके यांच्यासाठी ५ लाख आणि पोलिस शिपाई राहुल वाघ याच्यासाठी ५० हजार रुपये, असे एकूण ५ लाख ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना आबा सावळा वळकुंदे (४८) आणि महादेव पंढरी माने (३९) या दोन खासगी दलालांना एसीबीने रंगेहाथ जेरबंद केले.
पोलिसांवर गुन्हे दाखल, तपास तीव्र
दलालांच्या अटकेनंतर या प्रकरणात मोठी कारवाई करत पोलिस हवालदार अनिल महादेव शिंदे आणि पोलिस शिपाई राहुल मारुती वाघ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या संपूर्ण रॅकेटमध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष वाळके यांच्या भूमिकेबाबत सखोल चौकशी करून पुढील कायदेशीर निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती देण्यात येत आहे. गर्भलिंगनिदान चाचणीच्या गुन्ह्यावरून सुरू झालेला हा प्रवास आता पोलिसांमधील कथित लाचखोरी आणि वसुलीच्या गंभीर प्रकारापर्यंत पोहोचल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून, एसीबीकडून या प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे.



