गुन्हेगारीपुणे शहरमहाराष्ट्रराष्ट्रीयशैक्षणिकसंपादकीय अग्रलेखसामाजिक

“महाराष्ट्र मिशन” संपादकीय अग्रलेख: नवशिक्या गुंडांचा उतमात अन भयभीत लोक

“महाराष्ट्र मिशन” संपादकीय अग्रलेख

 

बोटाला सुई टोचली

जीव किती कळवळतो ,

सुरे, तलवारी खसाखस

भोकसतात

कसं वाटतं असेल ?

 

साधा चटका बसला

माणूस किती घाबरतो,

साले, जिवंत जाळून मारतात

कसं वाटत असेल…?

 

साधा पदर ढळला

तर –

बाई किती शरमते,

साले, नग्न धिंड काढतात रे

कसं वाटतं असेल…?

 

किती यातना, किती अपमान

किती वेदना

कसं सोसत असेल…?

विद्रोही कवी नामदेव ढसाळ यांच्या कवितेतल्या ओळी हल्ली आठवत राहाव्यात असे सध्याचे दिवस. पुणे शहरच काय मणिपूर किंवा दिल्लीत, रशिया युक्रेन मध्ये, अमेरिकेत जगाच्या पाठीवर आजुबाजूला नीट पाहिलं तर सारं जग पुन्हा आदीमानव मनोवस्थेत परततं आहे की काय अशी भिती वाटू लागलीय. माणसातलं जनावर माणूस होता होता मध्येच थबकून उलट्या दिशेने चाललंय असं वाटतंय.

दिल्लीत एकतर्फी प्रेमातून एका मुलीला तीस ते पस्तीस वेळा भोसकणारा हैवान असो किंवा पुण्यात पेरुगेट चौकीजवळ अशाच कुठल्या कारणावरून महाविद्यालयीन युवतीवर हिंस्र हल्ला करणारा नराधम, प्रवृती एकसारखीच. गुन्हेगाराला जात, धर्म नसतो असं म्हणतात ते खोटं नाही. दहशत हाच त्यांचा धर्म आणि तीच रोजीरोटी. महिला आणि मुलींच्याच नव्हे, नाकासमोर चालणाऱ्या, कायद्याला घाबरून राहणाऱ्या पुरुषांचं, एकूणच सामान्य लोकांचं जीवित आजकाल सुखरूप राहिलेलं नाही. कोरोना काळानंतर गुन्हेगारीही वाढणार असं भाकित समाजशास्त्र करत होते,ते दुर्दैवाने खरं ठरतंय.

कुठल्याही किरकोळ कारणावरून सामान्य लोकांवर कोयते,सुरे उगारुन जीव घेणारे, तुकडे करायची धमकी देणारे नवशिके गुंड जागोजागी लोकांना हैराण करताहेत. पुणं या नकाशावर सध्या ठळक दिसू लागलंय. पोलिसांचा दरारा निर्माण होईल,असं वातावरण दिसत नाही. पण दोष फक्त पोलिसांना देऊन चालणार नाही. पोलीस म्हणजे याच समाजाचा एक भाग. त्यांनाही नाना तऱ्हेची कामं आणि त्या कामांमध्ये येणारे मानवी, तांत्रिक, राजकीय अडथळे आणि मुख्य म्हणजे ‘काय द्यायचं बोला’ ही भ्रष्टावस्था. त्यामुळं आजच्या भयाण परिस्थितीला खतपाणी मिळत गेलं, हे वास्तव विसरून कसं चालेल?

पुण्यासारख्या शहरात छोट्या-मोठ्या उपनगरांतील अनेक मुले गांजा, दारु अशा नशेच्या आहारी गेलेली. बहुतांश मुलांचे आईबाप कष्टकरी, रस्त्यावरचे. काही पोरं भरकटल्यामुळं गुन्हेगारी टोळ्यांशी जोडली गेली. कोवळ्या वयातच गुन्हेगारी टोळक्यांशी संधान झाल्यानं बेदरकारपणा या मुलांमध्ये भिनला. भरधाव वेगानं बाईक चालवणं, भर रस्त्यात तलवारीनं केक कापणं, सामान्य लोकांवर, दुकानदार, पथारीवाले,स्टाॅलवाले अशांवर कोयते उगारत पैसा वसूल करणं अशा वाढत्या घटना मध्यवर्ती शहरामध्ये आणि उपनगरातही घडतात.

मोटर कारसह दुचाकी वाहनांची नाहक तोडफोड , जाळपोळ करत दहशत निर्माण केली जाते. अशी मुलं शक्यतो डबल सीट किंवा ट्रीपल सीट असतात. राॅंग साईडने सुसाट येणं, समोरच्या वाहनचालकाला कट मारुन जाणं, रस्त्याच्या मुलींची छेडछाड करणं किंवा पादचाऱ्यांच्या अंगावर बाईक घालून त्यांना घाबरवणं, कधीकधी लोकांच्या अंगावर थुंकणं अशा त्यांच्या विचित्र उन्मादाला आवर घालणं कठीण होऊन बसलंय.

अशा उन्मादी वयात हातात आधी बूम स्टाईल बाईक येते. नंतर कोयता किंवा तसंच काही हत्यार. ते अडवलं नाही, तर नवशिक्या गुंडाचा हळूहळू भाई बनतो. या भाईला जर वेसण बसली नाही तर काळाच्या टप्प्यात दाऊद इब्राहिम किंवा तत्सम माफिया बनत भस्मासूर जन्माला येतात हे या देशाचं वास्तव. अशा भाईंचा उपद्रव सहन करत राहणं हेच नशिबी आहे की काय असं वाटत असताना पेरुगेट चौकीजवळचा तो बहुचर्चित हल्ला झाला. पोलीस खडबडून जागे झाले. नंतर शहरात किमान पोलीस अस्तित्व दिसू लागलं. त्यामुळे लोकांना हायसं वाटलं. पण हे हायसं वाटणं किती दिवस टिकेल याची शाश्वती नाही. कारण एखादी घटना विरुन गेली की पुन्हा पहिले पाढे पंचावन्न ही परिस्थिती निर्माण होते हा इतिहास.

‘आम्ही काय वाटेल ते करु, आमच्या वाटेत आडवं यायचं नाही’ असा या बेदरकार, बेपर्वा पोरांचा खाक्या असतो. कुठल्याही किरकोळ कारणावरून ही पोरं जो आडवा येईल त्याचा वचपा काढण्यासाठी वाटेल त्या थराला जातात. म्हणूनच घरासमोर आरडाओरडा करणाऱ्या धुंद पोरांना रोखण्यासाठी गेलेल्या ६० वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाला कोयत्याने सपासप वार करून संपवून टाकण्यात आलं. असेच अनेक प्रकार गेल्या काही महिन्यांत झाले. गेल्या पाच सहा महिन्यात कोणाशीही कसलंही घेणं देणं नसताना अनेकांचा जीव गेला. अनेक लोक कायमचे जायबंदी झाले. लोकांच्या जीवावर हकनाक उठलेली टोळकी आणि त्या टोळक्यांमध्ये सामील झालेली कोवळी मुलं यांना पोलीस ठाणी आणि कोर्टाचे उंबरठे झिजवावे लागणार. १८ वर्षांवरची जी सज्ञान मुलं त्यात होती ती जेलची हवा खाणार. ज्याच्यावर दादागिरी होते त्याचं कुटुंब संकटात आणि जो दादागिरी करतो त्याच्या आईबापांना सुध्दा नसता घोर. वकील,कोर्ट कचेरी आणि पोलीस या साऱ्या साठी लागणारा पैसा लागतो. तो कुठून आणायचा?

‘जिथे मन भयमुक्त आहे, आणि मान अभिमानाने उंचावेल अशा जगात माझ्या देशाला घेऊन चल’ अशी प्रार्थना रविंद्रनाथ टागोर यांनी स्वातंत्र्य काळापूर्वी केली होती. त्या मागील भावना प्रत्यक्षात येणं सोडाच, भयग्रस्तता मात्र भयंकर वाढली आहे. वाट चुकलेल्या मुलांमुळे अशी भयग्रस्तता निर्माण होत असेल तर अशा मुलांना योग्य मार्ग दाखवणं ही सुद्धा सामाजिक जबाबदारी. एकुणात समाजात निर्माण झालेली ही भाईगिरीची कीड संपवण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर सतत प्रयत्न झाले पाहिजेत, अन्यथा येणारा काळ अंध:कारमय ठरलेला राहील.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page