लाडकी बहीण’ अपात्रता: पडताळणीनंतरच खरी संख्या स्पष्ट होणार – तटकरे

मुंबई : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत ई-केवायसी (e-KYC) प्रक्रियेनंतर तब्बल ८० लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आल्याचा विरोधकांचा आरोप पूर्णपणे दिशाभूल करणारा आहे, असे स्पष्टीकरण महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सोमवारी दिले. सध्या लाभार्थींची विविध निकषांनुसार पडताळणी सुरू असून, ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच अपात्र लाभार्थ्यांची नेमकी संख्या समोर येईल, असे त्यांनी सांगितले. योजनेअंतर्गत ८० लाख महिलांना अपात्र ठरवल्याचा आरोप करत विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला होता. यावर वस्तूस्थिती मांडताना आदिती तटकरे म्हणाल्या की, “८० लाखांचा हा आकडा केवळ ई-केवायसी न केलेल्या महिलांचा नाही. यामध्ये उत्पन्न मर्यादा ओलांडणारे लाभार्थी, वयोमर्यादा पूर्ण झालेल्या महिला, तसेच इतर शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्यांचाही समावेश आहे.”
सध्या अर्जांची छाननी आणि पडताळणीचे काम युद्धपातळीवर सुरू असून, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.



