अनिल अंबानींचे निकटवर्तीय अमिताभ झुनझुनवाला यांना मुंबईत CBI कडून अटक; आर्थर रोड जेलमध्ये रवानगी

मुंबई : अनिल अंबानी यांच्या नेतृत्वाखालील ‘रिलायन्स ग्रुप’ला आणि रिलायन्स कम्युनिकेशन्स (RCom) समूहाला मोठा धक्का बसला आहे. अब्जावधी रुपयांच्या बँक कर्ज फसवणूक प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) समूहाचे माजी ग्रुप मॅनेजिंग डायरेक्टर अमिताभ झुनझुनवाला यांना मुंबईत रीतसर अटक केली आहे. बँकांकडून मिळालेल्या कर्जाच्या निधीचा गैरवापर करून सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
झुनझुनवाला हे ईडीच्या (ED) एका मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्लीच्या तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडीत होते. त्यांना ट्रान्झिट प्रॉडक्शन वॉरंटवर मुंबईत आणण्यात आले. मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने सीबीआयला त्यांना अटक करण्याची परवानगी दिली. सध्या त्यांची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्यात आली असून, पोलीस कोठडीच्या मागणीवर उद्या (मंगळवारी) सुनावणी होणार आहे.
सीबीआयने कोर्टात सांगितले की, झुनझुनवाला हे समूहाच्या कॉर्पोरेट फायनान्स, बँकिंग आणि निधी वापराशी संबंधित अत्यंत महत्त्वाच्या कामकाजावर नियंत्रण ठेवत होते. विविध बँकांकडून कर्ज मिळवून देण्यात त्यांनी मुख्य भूमिका बजावली आणि त्यांच्याच निर्देशानुसार निधीचा गैरवापर करण्यात आला.
१६ जणांविरोधात पहिले आरोपपत्र दाखल
सीबीआयने नुकतेच २९ मे २०२६ रोजी या प्रकरणात पहिले आरोपपत्र (Chargesheet) दाखल केले आहे. यामध्ये रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेड कंपनीसह एकूण १६ आरोपींचा समावेश आहे. यामध्ये आरकॉमचे ५ वरिष्ठ अधिकारी आणि कर्ज मंजूर करणाऱ्या विविध बँकांच्या (SBI, बँक ऑफ महाराष्ट्र आणि तत्कालीन सिंडिकेट बँक) १० बँक अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या आरोपपत्रात झुनझुनवाला यांचे नाव नसले तरी त्यांच्याविरुद्धचा तपास सुरू होता आणि त्याअंतर्गतच ही अटक करण्यात आली आहे.
आता सीबीआयने अनिल अंबानींच्या सर्वात विश्वासू आणि वरिष्ठ अधिकाऱ्याला अटक केल्यामुळे रिलायन्स एडीजी (ADAG) समूहाच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.



