मोफत प्रवासासाठी एनसीएमसी कार्ड बंधनकारक; एसटी महामंडळाचे आवाहन!

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून शासनाच्या विविध सवलतींमध्ये प्रवास करणाऱ्या महिला आणि ६५ ते ७५ वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांसाठी आजपासून (१ सप्टेंबर २०२६) राष्ट्रीय सामान्य गतिशीलता कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. या नव्या निर्णयानुसार आता सवलतीचे तिकीट केवळ एनसीएमसी कार्डद्वारेच दिले जाणार असून, आतापर्यंत राज्यभरातून १ कोटी ११ लाख ७८ हजार ९० प्रवाशांनी या कार्डसाठी नोंदणी केली आहे.
कार्ड नोंदणी आणि वितरणाची व्यवस्था
एसटी महामंडळाच्या सवलत योजनांचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांसाठी एनसीएमसी कार्ड नोंदणी व वितरणाचे काम ‘ई-बिक्स टेक्नॉलॉजीज लिमिटेड’ या कंपनीकडे सोपवण्यात आले आहे. सवलतीचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांनी प्रवासादरम्यान हे कार्ड स्वतःसोबत बाळगणे आणि त्यात आवश्यक रक्कम ‘टॉप-अप’ करून ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासंदर्भातील सविस्तर मानक कार्यप्रणाली (SOP) राज्यातील सर्व आगारांना पाठवण्यात आली आहे. सध्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची नोंदणी सुरू असून, पुढील टप्प्यात इतर सवलतधारक प्रवाशांनाही ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
७५ वर्षांवरील ज्येष्ठांना तात्पुरती मुदतवाढ
अनेक ज्येष्ठ नागरिकांचे हाताचे ठसे (बायोमेट्रिक) उमटत नसल्यामुळे नोंदणी प्रक्रियेत तांत्रिक अडचणी येत आहेत. ही बात लक्षात घेऊन, ७५ वर्षांवरील ‘अमृत ज्येष्ठ नागरिकां’साठी एनसीएमसी कार्डच्या सक्तीला तात्पुरती मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, ऐनवेळी होणारी गैरसोय टाळण्यासाठी इतर सर्व पात्र प्रवाशांनी जवळच्या एसटी आगारात जाऊन नोंदणी, वितरण व टॉप-अपची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, असे आवाहन महामंडळाकडून करण्यात आले आहे.
कार्ड कुठे उपलब्ध होणार?
मोफत प्रवास पासाचा लाभ घेण्यासाठी सशुल्क ‘रुपे ऑन द गो’ सक्षम एनसीएमसी कार्ड घेणे आवश्यक आहे. हे कार्ड ईबिक्स टेक्नॉलॉजी लिमिटेडमार्फत एसटीच्या २५१ आगारांत, ३३५ वाहतूक नियंत्रण कक्षांत आणि एनएसडीएल पेमेंट बँकेच्या अधिकृत एजंटमार्फत वितरित केले जात आहे. तसेच, एसटीच्या सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचारी, पती-पत्नी संयुक्त पासधारक आणि मृत कर्मचाऱ्यांच्या विधवा किंवा विधुरांसाठी स्वतंत्र अर्ज प्रक्रियेद्वारे ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.



