डॉ. आंबेडकरांचे नाव घेण्याचा अधिकार गवईंनी गमावला श्याम मानव यांची टीका

अमरावती: सरन्यायाधीश भूषण गवई यांनी नुकतीच मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध बागेश्वर धामला कुटुंबासह भेट दिली. या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. गवई यांनी बागेश्वर उर्फ धीरेंद्र शास्त्री यांची भेट घेतल्यानंतर गवई धीरेंद्र शास्त्री महाराजांच्या पाया पडायला गेले होते, याचा आपल्याला प्रचंड धक्का बसला आहे. यापुढे त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेऊ नयेत अशा शब्दात अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी टीका केली.
अमरावतीत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये श्याम मानव म्हणाले ” यापूर्वी धीरेंद्र शास्त्री या विकृत बाबाचा दीक्षाभूमीवर सत्कार घेण्यात आला होता. त्यावेळेस मी त्याला विरोध केला होता. गवई हे रा. सू. गवई यांचे सुपुत्र आहेत. भूषण गवई म्हणतात की ते स्वतः आंबेडकरी विचारांचे आहेत. आंबेडकरी विचारांचं त्यांनी दूध प्यायल्याचा दावा करतात. पण ते जर धीरेंद्र शास्त्री महाराजांच्या पाया पडून आशीर्वाद घेत असतील तर यापुढे त्यांनी यापुढे डॉ. आंबेडकरांचे नाव कधीही घ्यायचे नाही, तो अधिकार त्यांनी गमावलेला आहे. तोंडातून पुन्हा आंबेडकरांचे नावच काढू नका.”



