लग्नाच्या वरातीत नाचण्यावरुन झालेल्या भांडणातून खून
पोलिसांनी १० तासात गुन्हेगारांना केले गजाआड

पुणे : वेल्हे तालुक्यात लग्नाच्या वरातीत नाचण्यावरुन झालेल्या भांडणाच्या रागातून टोळक्याने कात्रजमध्ये चायनीज स्टॉल मालकाचा खून केला. भारती विद्यापीठ पोलिसांनी १० तासात चहाच्या टपरीचालकासह चौघांना अटक केली.
तेजस दत्तात्रय पिलाने (वय २४, रा. पार्थदर्शन सोसायटी, मोहननगर धनकवडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. विशाल दत्तात्रय खोपडे (वय २२), अभिषेक दिलीप खोपडे (वय २३, दोघे रा. सच्चाईमाता, आंबेगाव), सचिन हरीचंद्र धुळे (वय ४३, रा. कात्रज), आदिनाथ शिवाजी कसबे (वय १९, रा. मांगडेवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
तेजस याचा भाऊ प्रदीप मारूती पिलाने (वय २७) याने फिर्याद दिली आहे. ही घटना शिवसृष्टी गदा चौकापासून कात्रजकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर शुक्रवारी २४ एप्रिल रोजी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली होती. आरोपी आणि मयत यांच्यात लग्नाच्या वरातीत नाचण्यावरुन भांडणे झाली होती.
विशाल खोपडे याची चहाची टपरी आहे. तेजस पिलाणे यांचा सिंहगड कॅम्प येथे चायनीजचा स्टॉल आहे. स्टॉल बंद करुन साफसफाई झाल्यावर तेथे काम करणाऱ्या थापा या कामगाराला घरी सोडण्यासाठी तेजस पिलाणे हे दुचाकीवरुन जात होते. शिवसृष्टी चौकापासून ते पुढे आल्यावर मागून दुचाकीवर काही जण आले. त्यांनी तेजस यांच्या दुचाकीला त्यांची दुचाकी धडकवली. ते खाली पडले.
हल्लेखोरांच्या हातातील कोयते पाहून मागे बसलेला थापा पळून गेला. हल्लेखोरांनी तेजस पिलाणे याच्यावर सपासप वार करुन त्याचा खून केला. पोलिसांना याची माहिती मिळाल्यावर त्यांनी तेजस याला भारती हॉस्पिटलमध्ये नेले. डॉक्टरांनी तपासणी करुन त्याला मयत घोषित केले. भारती विद्यापीठ पोलिसांनी १० तासात गुन्हेगारांना गजाआड केले.



