भ्रष्टाचाराने मळकटलेल्या वातावरणात अमितेशकुमार यांच्या प्रतिमेमुळे दिलासा

सध्या राज्य पोलीस दलात एका वेगळ्या प्रकारचे वातावरण आहे. पोलिसांनी आपली प्रतिमा प्रामाणिक आणि स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, तरच नागरिक त्यांच्यावर विश्वास करतील. पुण्यात अशीच दक्षता पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी घेतल्यानंतर चौकी स्तरापासून पोलीस उपायुक्त आणि आयुक्त कार्यालयापर्यंत अवैध धंदे करणाऱ्यांकडूनची हप्तेबाजी आटोक्यात आणली गेली आहे. गैरप्रकार करणारे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर त्यांनी प्रशासक म्हणून चांगली जरब बसवली. त्यामुळे दोन नंबरच्या हालचाली करणाऱ्यांचेही धाबे दणाणले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दिपक मानकर यांच्यावरही पोलीस फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यासारखे धाडसी पाऊल अमितेशकुमार यांनी उचलले. त्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा उंचावली आहे.
१९९५ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले अमितेशकुमार आॉक्टोबर २००५ ते जुलै २००७ असे दोन वर्षे राज्याची उपराजधानी नागपूरला परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त म्हणून कार्यरत होते. धडाकेबाज अधिकारी म्हणून त्यांनी येथे आपली ओळख निर्माण केली होती. अमितेशकुमार यांची पुणे पोलीस आयुक्तपदी ३१ जानेवारी २०२४ रोजी नियुक्ती झाली. पुण्यात सुध्दा त्यांनी गेल्या दीड वर्षापासून काम सांभाळत असताना कोयता गॅंग सारख्या रस्त्यावर उपद्रव करणाऱ्या टोळ्यांचा बंदोबस्त केला आहे. गुंड टोळ्यांचा बऱ्यापैकी बिमोड केल्याने पुणेकरांना सुखाचा श्वास घेणे शक्य झाले आहे. पोलीस दलात सुध्दा अंतर्गत व्यवस्था सुधारण्यासाठी बदल्या, निलंबन अशी कठोर पावले उचलून भ्रष्ट अधिकारी कर्मचाऱ्यांना हिसका दाखवला आहे.
कोण कोणाकडून किती वसुली करत आहे?
दरम्यान, पुण्यात भ्रष्ट, कामचुकारपणा करणारे आणि गैरव्यवहार करणारे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना त्यांची जागा दाखवून देण्याचे कामही पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गेल्या १८ महिन्यात केले. ‘माझ्याकडे संपूर्ण स्टेटमेंट आलं आहे की कोणता अधिकारी आणि कर्मचारी कुठून किती वसुली करत आहे. अवैध धंद्यांमधून वसुली सुरू आहे, म्हणूनच कारवाई होत नाही’ हे त्यांचे वक्तव्य गैरप्रकार करणाऱ्यांना धडकी भरवणारे ठरले.
वाहतुकीच्या प्रश्नांबाबतही अमितेशकुमार जागरूक असल्याने दीड वर्षांपासून शहरात वाहतूक व्यवस्थेत ठळक बदल दिसून येत आहेत. अधिकाऱ्यांच्या एका बैठकीत ते म्हणाले की दुपारी जड वाहनांवर बंदी आहे, तरीसुद्धा ती वाहने रस्त्यावर कशी दिसतात? म्हणजे पोलिसांचा धाकच राहिलेला नाही, की तुम्हीच डोळे झाकून बसला आहात? एक आठवड्यात अपघातांवर नियंत्रण आणा. ऑफिसमध्ये बसून वाहतूक नियोजन होत नाही, रस्त्यावर उतरूनच खरे नियोजन होते. त्यानंतर खरोखरच पोलीस अधिकारी आणि कर्मचारी रस्त्यावर उतरून सकाळी आणि संध्याकाळी वाहतूक नियंत्रणाच्या कामात दिसून येत आहेत. त्यांच्या जोडीला ट्रॅफिक वाॅर्डनचेही संख्याबळ आल्यावर या प्रश्नावर वाहतूक पोलिसांनी नियंत्रण मिळवल्याचे दिसते आहे.
पुण्यात शारीरिक दुखापतीचे गुन्हे जास्त आहेत. मात्र, पोलीस आयुक्त अमितेशकुमार आणि त्यांचे सहकारी गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी चांगले प्रयत्न करत आहेत. शहराच्या विविध भागात दहशत माजवून सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांविरुद्ध अमितेश कुमार यांनी एमपीडीए कायद्याचे हत्यार उपसले. वर्षभरातच तब्बल १०३ गुन्हेगारांना एक वर्षासाठी स्थानबद्ध केले आहे.
विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये खुनाचा प्रयत्न, खंडणी, गंभीर दुखापत, जबरी चोरी, वाहन तोडफोड, दंगल, बेकायदेशीर अग्निशस्त्रे, हत्यारे बाळगणे, गावठी हातभट्टी निर्मिती व विक्री अशा स्वरुपाचे गंभीर गुन्हे करुन दहशत निर्माण करणाऱ्या व सार्वजनिक सुव्यवस्था बाधित करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांना नागपूर, चंद्रपूर, अकोला, अमरावती, कोल्हापूर, नाशिक अशा राज्यातील विविध कारागृहामध्ये एक वर्षासाठी स्थानबद्ध केले. त्यामुळे त्या त्या परिसरात सामान्य माणसाला मोकळा श्वास घेता येतो आहे. स्वच्छ प्रतिमेचे अधिकारी म्हणून त्यांनी राज्यात चांगली कामगिरी सुरू ठेवली आहे. महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत आणि शहरांमध्ये आयुक्त, अधीक्षक म्हणून किंवा त्या समकक्ष कामे करणाऱ्या अधिकाऱ्यांनी अमितेशकुमार यांच्या पासून प्रेरणा घेण्याची गरज आहे. अमिताभ गुप्ता किंवा जालिंदर सुपेकर अशा डागाळलेल्या अधिकाऱ्यांची गरज महाराष्ट्रात नाही. त्यांच्या सारख्या लोकांमुळे खालच्या स्तरावर काम करणाऱ्यांच्या मनातही वेगळे विचार डोकावून कारभार नासून जातो हे लक्षात घेऊन अमितेशकुमार यांच्या सारख्या नाॅन करप्ट अधिकाऱ्याला नागरिकांनीही सक्रिय पाठिंबा दिला पाहिजे.
पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी अवघ्या ११ महिन्यात एमपीडीए कारवाईचे शतक पार केले. यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांच्या कृत्यांना आळा घालण्यासाठी अधिकाधिक कठोर व प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येईल, असा त्यांचा इशारा होता, तो त्यांनी खरा करून दाखवला. अभ्यास आणि नियोजन करून पोलीस विभागासाठी काही नवीन उपाययोजना अंमलात आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
अमितेशकुमार यांनी अट्टल गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यासाठी मोक्का एमपीडीए सेल सुरु केला. गुंडगिरी ,भाईगिरी करणाऱ्यांविरुद्ध झोपडपट्टी प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाईसाठी पीसीबी विभागाला वेळोवेळी रेकॉर्ड प्राप्त करावे लागते. संबंधित गुन्हेगाराची मागील पाच वर्षातील गुन्ह्यांची माहिती एकत्रित करुन त्यासाठी आवश्यक सर्व कागदपत्रांचा पाठपुरावा करून एमपीडीएनुसार कारवाईला वेग दिला जातो. त्यानंतर सर्व कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्त एमपीडीएनुसार कारवाई करुन राज्यातील कोणत्याही कारागृहात गुन्हेगाराला एक वर्षासाठी स्थानबद्ध करतात.
आपल्या कार्यशैलीमुळे अमितेशकुमार सध्या गृहमंत्री, मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालक या तिघांच्याही ‘गुडबुक’मध्ये आहेत.
४ वर्षांपूर्वी अमितेशकुमार यांचे नाव नागपूरचे पोलीस आयुक्त म्हणून चर्चेला आले तेव्हा ते राज्य गुप्तवार्ता विभागात सहआयुक्त होते. नागपूरचे पोलीस आयुक्तपद अतिरिक्त पोलीस महासंचालकांच्या श्रेणीचे आहे. अमितेशकुमार यांना येथे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्त करायचे असल्यास सरकारला त्यांचे प्रमोशन करावे लागणार होते. किंवा नागपूरच्या आयुक्तपदाची श्रेणी कमी करून ते पद महानिरीक्षक दर्जाचे करावे लागणार होते. या दोन्ही बाबी सरकार करू शकत होते. अमितेशकुमार यांची कौतुकास्पद सेवा तसेच सेवाकाळ बघता त्यांची पदोन्नती करण्यात आली.
महाराष्ट्रात साऱ्या कारकिर्दीत ३० वर्ष त्यांची प्रतिमा निष्कलंक राहिली. त्यांचा आदर्श अन्य अधिकाऱ्यांनी घेऊन पोलीस दलाचे चारित्र्य स्वच्छ ठेवण्यासाठी मदत केली पाहिजे. पुण्यातील कुप्रसिद्ध राजेंद्र हगवणेंचे नातेवाईक असलेल्या जालिंदर सुपेकर या आयपीएस वरील गैरप्रकारांचे आरोप आणि माजी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यावरही झालेले कोट्यवधींच्या घोटाळ्यांचे आरोप या पार्श्वभूमीवर अमितेशकुमार यांची प्रतिमा निश्चितच उज्ज्वल आणि भ्रष्टाचारात मळकटलेल्या वातावरणात दिलासादायक मानली पाहिजे.
कोण आहेत नॉन करप्ट अमितेशकुमार?
अमितेश कुमार यांच्या विषयी जनसामान्यांमध्ये उत्सुकता असते. ते मूळचे बिहारचे असून त्यांनी दिल्लीतील सेंट स्टीफन्स कॉलेजमधून अर्थशास्त्रात पदवी प्राप्त केली. याशिवाय त्यांनी सायबर कायद्यात पदव्युत्तर पदवी पूर्ण केली. १९९५ मध्ये अमितेश कुमार यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली. ही परीक्षा दिल्यानंतर ते अखिल भारतीय गुणवत्ता यादीत ५९ व्या क्रमांकावर आले. त्यानंतर अमितेश कुमार यांना महाराष्ट्र कॅडरचे पोलीस अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले. महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात पाठवण्यात आले. १९९७ मध्ये त्यांची सहाय्यक अधीक्षक पदी नियुक्ती झाली. त्यानंतर औरंगाबाद ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती झाली. त्यांनी काही काळ अमरावती जिल्ह्याचे एसपी म्हणूनही काम केले. त्यानंतर त्यांना नागपूरचे उपायुक्तपद देण्यात आले. बदलीनंतर ते मुंबईला गेले आणि पोलिस उपायुक्त झाले.



