नवी दिल्लीराष्ट्रीय

अहमदाबाद विमान दुर्घटना; चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०

नवी दिल्ली : अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातात २६५ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले होते. जखमींवर स्थानिक रुग्णालयांत उपचार सुरू होते. दरम्यान, आता मृतांचा आकडा २७० वर पोहोचला असून, आतापर्यंत ९ मृतदेहांची ओळख पटली आहे. या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी आता उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्याची घोषणा केंद्र सरकारने केली. या समितीचे नेतृत्व केंद्रीय गृह सचिव यांच्याकडे असणार आहे. ही समिती ३ महिन्यांत आपला अहवाल सादर करणार आहे.

विमान अपघाताच्या चौकशीसाठी नेमलेली उच्चस्तरीय समिती ही केवळ एअर इंडियाच्या एआय-१७१ विमान अपघाताचीच चौकशी करणार नाही तर भविष्यात अशा दुर्घटना घडणार नाहीत, यासाठी भारतीय विमान उड्डयन विभागाने सुरक्षेच्या दृष्टीने काय पावले टाकायला हवेत, यासंबंधीही शिफारशी करणार आहे. ही समिती देशांतर्गत विमान कंपन्यांसाठी मार्गदर्शक तत्वे निश्चित करणार आहे. या मार्गदर्शक तत्त्वाच्या आधारे केंद्र सरकार एक लिखित आदेश जारी करेल. जेणेकरून भारतीय विमान उड्डयन विभाग अधिक सुरक्षित बनण्यास मदत होईल.

एअर इंडियाच्या विमानाने दि. १२ जून रोजी दुपारी अहमदाबाद येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनसाठी उड्डाण घेतले होते. परंतु टेक ऑफनंतर अवघ्या काही मिनिटांतच हे विमान कोसळले. या विमानात पायलट, क्रू मेंबर्ससह २४२ प्रवासी होते. एक प्रवासी वगळता २४१ जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे हे विमान नागरी वस्तीत म्हणजेच बी. जे. वैद्यकीय कॉलेजच्या हॉस्टेलच्या इमारतीला धडकल्याने कँटिनमध्ये जेवण करणारे जवळपास २४ भावी डॉक्टरही दगावले. त्यामुळे मृतांचा आकडा २६५ वर गेला होता. त्यातच हॉस्टेल आणि परिसरातील अनेकजण जखमी झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आणखी ५ जणांचा मृत्यू झाल्याने आता मृतांचा आकडा २७० वर पोहोचला आहे.

ब्लॅक बॉक्स डीकोडींग करण्याचे काम सुरू

नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू म्हणाले की, “विमानातील ब्लॅक बॉक्स सापडला असून त्याचा डेटा डीकोड केला जात आहे. तर अनेक एजन्सी आणि उच्चस्तरीय पॅनेल या घटनेची व्यापक चौकशी करत आहेत. विमान अपघात तपास ब्युरो (एएआयबी) तत्काळ तैनात करण्यात आले असून परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एएआयबीच्या महासंचालकांनी घटनास्थळी भेट दिली. ब्लॅक बॉक्सचे हे डीकोडिंग अपघातादरम्यान किंवा अपघातापूर्वीच्या काही क्षणांमध्ये प्रत्यक्षात काय घडले असेल याची सखोल माहिती देईल, असा विश्वास आहे.”

एअर इंडियाकडून २५ लाखांची अतिरिक्त मदत जाहीर

विमान अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना टाटा समूहाने १ कोटी रुपयांची मदत जाहीर केली असतानाच आता विमान कंपनी एअर इंडियाने अतिरिक्त २५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. “विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सर्वांच्या कुटुंबीयांना आणि एकमेव बचावलेल्या व्यक्तीला २५ लाख रुपयांची भरपाई देणार आहे,” असे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले.

अपघाताचा व्हिडीओ बनवणाऱ्या मुलाचा पोलिसांसमोर जबाब

विमान अपघाताचा मोबाईल फोनवरून व्हिडीओ बनवणाऱ्या १७ वर्षीय मुलाचा जबाब अहमदाबाद पोलिसांनी नोंदविला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पत्रकारांशी बोलताना व्हिडीओ बनविणारा मुलगा आर्यन म्हणाला की, रेकॉर्डिंग सुरू केल्यानंतर २४ सेकंदात हा अपघात झाला. आर्यन हा नियमितपणे विमानांच्या उड्डाणाचे व्हिडीओ बनवितो. त्या दिवशी या व्हिडीओमध्ये या विमान अपघाताचे शूटिंग झाले. पोलिसांनी सांगितले की, व्हिडीओ बनवल्याबद्दल कोणालाही अटक करण्यात आलेले नाही. व्हिडीओ बनवणाऱ्या अल्पवयीन मुलाने व्हिडीओची माहिती पोलिसांना दिली आहे. तो त्याच्या वडिलांसोबत साक्षीदार म्हणून त्याचे म्हणणे नोंदवण्यासाठी आला होता. त्यानंतर मुलाला त्याच्या वडिलांसोबत पाठवण्यात आले. आर्यन म्हणाला, मी जे पाहिले ते पाहून मी खूप घाबरलो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page