गाझात मदत वाटप केंद्रांजवळ ७९८ लोकांचा बळी

संयुक्त राष्ट्रे : गाझा पट्टीमध्ये मदत वाटप केंद्रांजवळ आणि मदत गटांवर झालेल्या हल्ल्यांमध्ये गेल्या सहा आठवड्यांत तब्बल ७९८ लोकांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक अहवाल संयुक्त राष्ट्र मानवाधिकार कार्यालयाने प्रसिद्ध केला आहे. यातील बहुतांश मृत्यू गोळी लागल्याने झाल्याचे समोर आले असून, संयुक्त राष्ट्रांनी या परिस्थितीला मानवतेच्या मूल्यांचे उल्लंघन, असे म्हटले आहे.
अहवालानुसार, मृतांपैकी ६१५ मृत्यू अमेरिकेच्या आणि इस्रायलच्या पाठिंब्याने कार्यरत असलेल्या गाझा ह्युमॅनिटेरियन फाऊंडेशनच्या मदत केंद्रांच्या परिसरात झाले आहेत. तर, उर्वरित १८३ मृत्यू इतर मदत गटांच्या काफिल्यांवर झालेल्या हल्ल्यांमध्ये झाले आहेत. बहुसंख्य जखमींना गोळी लागल्याने दुखापत झाली आहे.
गाझा ह्युमॅनिटेरियन फाऊंडेशनने गेल्या पाच आठवड्यांत गाझामध्ये ७ कोटींहून अधिक खाद्य पॅकेट्स वाटल्याचा दावा केला आहे, तर इतर मानवतावादी गटांची मदत हमास किंवा गुन्हेगारी टोळ्यांनी लुटल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे, संयुक्त राष्ट्रांनी मदत लुटीच्या घटनांना दुजोरा दिला आहे
गाझामध्ये २१ महिन्यांपासून सुरू असलेल्या लष्करी कारवाईमुळे अन्न आणि इतर मूलभूत पुरवठ्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. २३ लाख लोकसंख्येपैकी बहुसंख्य लोक विस्थापित झाले आहेत.



