सामाजिक

पाकिस्तानच्या क्वेटा शहरात रेल्वे ट्रॅकजवळ भयंकर स्फोट ; २३ जणांचा जागीच मृत्यू 

इस्लामाबाद: पाकिस्तानच्या क्वेटा शहरात रेल्वे ट्रॅकजवळ एक मोठा स्फोट झाला. या स्फोटात २३ जणांचा जागीच मृत्यू झाला असून ४७ लोक जखमी झाल्याचे सांगितले जात आहे.

हा स्फोट इतका भीषण होता की आजूबाजूच्या परिसरात धावपळ उडाली. सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सरकारी रुग्णालयांमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली आहे.

या स्फोटामुळे एक मालगाडी रुळावरून घसरली. रिपोर्ट्सनुसार, ही ट्रेन क्वेटा कँट परिसराच्या दिशेने जात होती, तेव्हाच रेल्वे लाईनवर हा स्फोट झाला. स्फोटानंतर परिसरात गोळीबाराचे आवाजही ऐकू आले, ज्यामुळे लोकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.

बलुचिस्तान सरकारचे अधिकारी बाबर युसूफजई यांनी सांगितले की, पोलीस, सुरक्षा दल आणि बचाव पथके तातडीने घटनास्थळी पोहोचली आहेत. हा स्फोट कसा झाला, याचा तपास आता पोलीस करत आहेत. अद्याप कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. बलुचिस्तान हा पाकिस्तानचा एक महत्त्वाचा भाग आहे, जिथे बऱ्याच काळापासून हिंसाचार आणि फुटीरतावादी कारवाया सुरू आहेत. येथे अनेक संघटना पाकिस्तान सरकारविरुद्ध लढा देत आहेत.

रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, क्वेटा कँटवरून येणाऱ्या शटल ट्रेनला चमन फाट्याजवळ लक्ष्य करण्यात आले. या स्फोटात इंजिनसह ट्रेनचे तीन डबे रुळावरून घसरले, तर दोन डबे उलटले. पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या १० गाड्यांचेही नुकसान झाले आहे. हा स्फोट इतका भीषण होता की आजूबाजूच्या इमारतींच्या खिडक्या आणि काचा फुटल्या. संपूर्ण परिसराला घेराव घालण्यात आला असून बचावकार्य (रेस्क्यू ऑपरेशन) सुरू आहे. या घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून पेशावरला जाणारी जाफर एक्सप्रेस क्वेटा रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आली आहे.

पाकिस्तानचे रेल्वे मंत्री मोहम्मद हनीफ अब्बासी यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. त्यांनी याला भ्याड दहशतवादी हल्ला म्हटले असून, असे हल्ले दहशतवादाविरुद्धच्या पाकिस्तानच्या संकल्पाला कमकुवत करू शकत नाहीत, असे ते म्हणाले. अब्बासी यांनी सांगितले की, अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी बचाव ट्रक आणि मदत ट्रेन (रिलीफ ट्रेन) घटनास्थळी पाठवण्यात आली आहे. रेल्वे मंत्र्यांनी अधिकाऱ्यांकडून या घटनेचा सविस्तर अहवाल मागवला आहे. या हल्ल्यानंतरही पाकिस्तान रेल्वेचे कामकाज सुरूच राहील आणि ट्रेन सेवा बंद केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page