लातूर

कुंपणानेच शेत खाल्ले! नीटचा पेपर सेट करणाऱ्या लातूरच्या दयानंद महाविद्यालयातील निवृत्त प्राध्यापकाला सीबीआयकडून बेड्या

लातूर : देशभर गाजत असलेल्या ‘नीट’ (NEET-UG) पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) मोठी कारवाई केली आहे. लातूर येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी यांना सीबीआयने अटक केली असून, या कारवाईमुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ माजली आहे.

प्राप्त माहितीनुसार, प्रा. पी. व्ही. कुलकर्णी हे लातूरमधील नामांकित दयानंद महाविद्यालयात रसायनशास्त्र (Chemistry) विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते. विशेष म्हणजे, नीट परीक्षेचा रसायनशास्त्राचा पेपर तयार करणाऱ्या तज्ज्ञांच्या समितीमध्ये त्यांचा समावेश होता. पेपर काढण्याच्या अतिशय गोपनीय प्रक्रियेत सहभागी असलेल्या व्यक्तीचेच नाव आता पेपरफुटी प्रकरणात समोर आल्याने या प्रकरणाचे धागेदोरे किती खोलवर आहेत, हे स्पष्ट होत आहे.

नीट परीक्षेतील गैरप्रकारांचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आल्यानंतर, लातूरमधील काही संशयित शिक्षकांवर आधीच कारवाई करण्यात आली होती. मात्र, आता थेट पेपर सेटिंग प्रक्रियेतील व्यक्तीला अटक झाल्याने तपासाला नवीन वळण मिळाले आहे. कुलकर्णी यांनी गोपनीयतेचा भंग करून माहिती लीक केली का, किंवा त्यांचे इतर कोणत्या रॅकेटशी संबंध आहेत का, याचा तपास आता सीबीआय करत आहे.

शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ

लातूर हे शिक्षणाचे ‘हब’ मानले जाते. अशा शहरातून एका निवृत्त प्राध्यापकाला, ज्यांनी अनेक वर्षे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, अशा व्यक्तीला अटक झाल्याने पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या अटकेनंतर आता नीट घोटाळ्यातील आणखी काही मोठी नावे समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page