पिंपरी-चिंचवडपुणे शहरमहाराष्ट्रराजकारणसामाजिक

पुण्यात उड्डाणपुलांची रचना बिनडोक पद्धतीने;  देवा भाऊंना साक्षात्कार !

भोसरीत ७० लाख खर्चाचा उड्डाणपूल ७ कोटींवर;  अजितदादांनी आज उघडले तोंड....

पुणे : पुण्यातील उड्डाणपुलांची रचना बिनडोक पद्धतीने करण्यात आल्याचे आता अनेक वर्षांनी पुढे आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत हा साक्षात्कार झाला तर तिकडे पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या सत्तेसाठी सरसावलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांना सुध्दा भोसरीतील ७० लाख खर्चाचा उड्डाणपूल ७ कोटींवर गेल्याचे आता समजले आहे.

दरम्यान, पुणेकरांसाठी मोफत मेट्रो आणि पीएमपीएल बस सेवा सुरू करण्याचे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला असून, सार्वजनिक वाहतुकीला चालना देण्याचा आणि नागरिकांचा प्रवास सुलभ करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.

वास्तविक, पीएमपीएमएल बससेवा सध्या तोट्यात असून, २ वर्षांपूर्वी बससेवेचा सुमारे एक हजार कोटी रुपयांचा तोटा होता. अद्याप एमएनजीएलचे ६५ कोटी रुपये मनपाकडे थकीत असताना मोफत बस योजना कशी राबवणार? त्यासाठी राज्य सरकारच्या मदतीची आवश्यकता आहे. त्यामुळे हा भाजपचा आक्षेप योग्यच आहे. मेट्रो, बस यांचा प्रवास फुकटात दिला जात असेल तर पुण्यातून उडणाऱ्या विमानांमधूनही महिलांना तिकीट माफी का नको? त्यामुळे अजितदादांनी देवाभाऊंची ही मागणी लक्षात घेतलीच पाहिजे.

दरम्यान, समस्यांच्या जंजाळात अडकलेल्या पुण्याचा गांभीर्याने विचार सुरू झाला २०१४ नंतर. भविष्यातील मेट्रो मार्गाचा विचार न झाल्याने पूल तोडण्याची वेळ आली. आता हा प्रकार होणार नाही. उन्नत मार्ग करताना सर्व सार्वजनिक वाहतुकीचा विचार केला जाईल. त्यानुसार आराखडे करण्यात आले आहेत, असे फडणवीस यांनी ‘संवाद पुणेकरांशी’ या उच्चस्तरीयांची उपस्थिती असलेल्या मुलाखत कार्यक्रमात स्पष्ट केले.

फडणवीस म्हणाले ”पुणे हे महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर देशासाठी अत्यंत महत्त्वाचे शहर आहे. मॅन्युफॅक्चरिंग, ऑटोमोटिव्ह, आयटी, फायनान्स आणि लॉजिस्टिक्स या क्षेत्रांतील राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी पुण्याला केंद्र बनविले आहे. सुंदर हवामान, कुशल मनुष्यबळ, मुबलक पाणी, सुरक्षित वातावरण, रोजगार-शिक्षणाचे उदंड पर्याय या कारणांमुळे देशभरातून लोक पुण्यात स्थलांतरित होत आहेत.”

ते म्हणाले ”या शतकाच्या सुरुवातीला हुकलेले नियोजन दुरुस्त करण्यासाठीच्या यातना आत्ताच्या पुणेकरांना कदाचित भोगाव्या लागत असतील; पण त्या तात्पुरत्या आहेत. ‘गटर, मीटर, वॉटर ‘ही कामे तर झालीच पाहिजेत, पण तेवढ्यावर न थांबता आधुनिक पुणे घडविण्याचा प्रारंभ भाजपाने केलाय. भारतातील सर्वोत्तम, पहिल्या क्रमांकाची ‘नॉन कॅपिटल सिटी’ म्हणून पुण्याला घडविण्यासाठी भाजपा कटिबद्ध आहे.”

रिंग रोडमुळे वाहतूक कोंडी कमी?

पुण्यात १०० किलोमीटरचे मेट्रो जाळे उभारले जात आहे. तसेच, मेट्रो आणि पीएमपीसाठी ‘सिंगल तिकीट’ प्रणाली लागू केली जाईल. सध्याच्या १ हजार ई-बसची संख्या ५ हजारांपर्यंत नेऊन ‘एन्ड टू एन्ड’ कनेक्टिव्हिटी दिली जाईल. पुणे रिंग रोडमुळे शहरातील ४० टक्के वाहतूक कोंडी कमी होईल, अशी स्वप्ने फडणवीस यांनी दाखवली आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या काही दिवसांपासून घोषणांचा पाऊसच पाडला. ते म्हणतात, ”पुणे केवळ एक शहर नसून, महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचे इंजिन आहे. राज्याच्या ५८० अब्ज डॉलर जीडीपीमध्ये पुण्याचा वाटा ७८ अब्जांचा आहे, तो २८० अब्ज डॉलरपर्यंत नेण्यासाठी आम्ही ‘पुणे ग्रोथ हब’ ही संकल्पना राबवीत आहोत. पुण्याचा विस्तार, संधी आणि वाढते नागरीकरण लक्षात घेऊन पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए परिसराचा एकात्मिक विकास केला जाईल.”

पुण्याच्या सहभागाशिवाय महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरची होऊ शकत नाही. मात्र त्यासाठी पुण्याच्या पायाभूत सुविधा, वाहतूक, दळणवळण, विमानतळ, रस्ते-महामार्ग इत्यादींचा वेगवान विकास आवश्यक आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारची मदत घ्यावी लागणार आहे, असे ते म्हणाले.

अडीच लाख कोटी रुपयांचा रिंग रोड 

वाहतूक कोंडीतून पुणेकरांना सोडविणारी मेट्रो, इलेक्ट्रिक बस-सीएनजी बस यातून रोज लाखो पुणेकर आरामदायी प्रवास करीत आहेत. ‘पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा’ची (पीएमआरडीए) स्थापना करून पुण्याच्या आसपासच्या भागाचे नियोजन सुरू झाले आहे. अडीच लाख कोटी रुपयांचे मूल्य तयार करणाऱ्या रिंग रोडची आखणी झाली आहे. नगर रस्ता, सोलापूर रस्ता, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, बेंगळुरू महामार्ग हे पुण्याच्या चारही दिशांचे महामार्ग कोंडीमुक्त करण्यासाठी उड्डाणपूल, पूल, महामार्ग बांधले जात आहेत.

विस्तारीकरण, आधुनिकीकरणाच्या माध्यमातून देशातील पहिल्या दहा विमानतळांमध्ये पुण्याच्या विमानतळाचा समावेश झाला आहे. पुरंदर विमानतळाच्या निर्मितीनंतर आंतरराष्ट्रीय नकाशावरही पुणे ठळकपणे झळकू लागेल, असे फडणवीस म्हणाले.

पुण्यात ३२ हजार कोटींचे आकाश आणि पाताळ लोक ! 

‘पुणे ५०० चौरस किमी क्षेत्रफळावर पसरले असून, येथे केवळ ९ टक्के रस्ते आहेत. ३२ प्रमुख रस्त्यांवर क्षमतेपेक्षा अडीच पट रहदारी आहे. यावर ‘पाताळ लोक’ विकसित करणे आवश्यक आहे. त्या अंतर्गत शहरात ५६ किलोमीटर लांबीचे भुयारी मार्ग आणि २३ उड्डाणपूल साकारण्यात येत आहेत. त्यासाठी ३२ हजार कोटी खर्च अपेक्षित आहे,’ असे फडणवीस म्हणाले. जमिनीखाली असलेल्या भुयारी मार्गाला फडणवीस नागपुरी भाषेत ‘पाताळ लोक’ म्हणत असतील तर उड्डाण पुलांच्या जाळ्यांना ‘आकाश लोक ‘ का म्हणत नाहीत? आकाशात आणि पाताळात पुणे नेण्यापेक्षा आजही रस्ते, पाणी, कचरा, वीज आणि गुन्हेगारी या भेडसावणाऱ्या समस्यांबाबतीत त्यांनी जमिनीवर आले पाहिजे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रविंद्र माळवदकर यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page