पोलिसांचे हक्काच्या घराचे स्वप्न होणार साकार; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ५ हजारहून अधिक घरांना हिरवा कंदील

मुंबई : राज्याच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधवांसाठी राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस गृहनिर्माण प्रकल्पांसाठी १७६८.०८ कोटी रुपयांच्या भरीव निधीला मंजुरी दिली असून, यामुळे सुमारे ५४५९ पोलिसांना त्यांच्या हक्काचे घर मिळणार आहे.
पोलीस कर्मचारी कोणत्याही सण-उत्सवाची किंवा वेळेची तमा न बाळगता जनतेच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर तैनात असतात. अनेकदा पोलिसांना राहण्याच्या सोयीअभावी विविध अडचणींचा सामना करावा लागतो. हीच बाब लक्षात घेऊन, ‘जनतेच्या सुरक्षेसाठी राबणाऱ्या हातांना हक्काचे घर मिळावे’ या उद्देशाने सरकारने हा मोठा आर्थिक आराखडा मंजूर केला आहे.
या योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या १७६८.०८ कोटी रुपयांतून राज्यातील विविध भागांत पोलीस वसाहतींचे बांधकाम आणि घरांचे नियोजन केले जाणार आहे. या निर्णयाचा थेट लाभ ५४५९ पोलीस कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबांना होणार आहे. या निर्णयामुळे पोलीस दलात आनंदाचे वातावरण पसरले असून, यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेतही वाढ होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
राज्य सरकारच्या या महत्त्वपूर्ण पावलामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पोलिसांच्या घरांचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे.



