मोटारसायकल वरून येत अज्ञात इसमाचा मुंबईत गोळीबार

नवी मुंबई : नवी मुंबईतील ऐरोलीत एका गजबजणाऱ्या परिसरात एका अज्ञात इसमाने मोटारसायकलीवरून येत गोळीबार केला. या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेनंतर इसम फरार झाला असून ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ऐरोली परिसरात ६ एप्रिल रोजी रात्री ११ वाजून ५० मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली. ऐरोली सेक्टर १ मधील छत्रपती शिवाजी रहिवाशी चाळ परिसरात अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला. यात अमित मौर्य गंभीर जखमी झाले आहेत.
छत्रपती शिवाजी रहिवाशी चाळ येथे अमित मौर्य आणि संदीप गवस हे उभे होते. यावेळी संशयित इसमाने मोटारसायकलवरून येऊन गोळीबार केला. आरोपीने यावेळी चार राऊंड फायरिंग केल्या. यामध्ये अमित मौर्य गंभीर जखमी झाले. त्यानंतर अमित मौर्य यांना तातडीने ऐरोलीतील इंद्रावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असून गोळी मानेत घुसली असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात नेण्यात आले आहे.
दरम्यान, स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली असता रबाळे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी आणि गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून त्यामध्ये एक संशयित इसम मोटारसायकलवरून येऊन गोळीबार करताना दिसत आहे. आरोपीविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ल्याचे कारण अद्याप समोर आले नसून सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु आहे. परंतु गजबजणाऱ्या परिसरात अशी घटना घडल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.



