नागपुरातील संवेदनशील भागात सापडली स्फोटकांनी भरलेली बॅग
१५ जिलेटिन कांड्या, ५० डिटोनेटर आणि ८ कनेक्टर जप्त

नागपूर : शहरातील अत्यंत वर्दळीच्या मार्गावरील मेयो रुग्णालयाला लागून असलेल्या दोसर भवन मेट्रो स्टेशनजवळ मंगळवारी सकाळी स्फोटकांनी भरलेली बॅग आढळली. यात १५ जिलेटिनच्या कांड्या, ५० डिटोनेटर्स आणि ८ कनेक्टर सापडल्याने एकच खळबळ उडाली. तिथून काही अंतरावरच पोद्दारेश्वर राम मंदिर आणि मोमिनपुरा आहे. रामनवमीला याच परिसरालगत शोभायात्राही होती. ज्यामध्ये लाखो भाविक ही सहभागी झाले होते. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात जिलेटिनच्या कांड्या आणि डिटोनेटर्स येथे सापडल्या या मागे घातपाताचा कट होता का, याचा छडा लावण्याचे नवे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.
बॉम्ब शोधक आणि नाशक पथकासह फॉरेन्सिक टीम आणि पेसोची टीम तिथे पोचली. दाटीवाटीचा परिसर आणि संवेदनशील परिसरात ही स्फोटके सापडल्याने संपूर्ण परिसराची नाकेबंदी बॅरिकेटिंग करण्यात आली. सुमारे महिनाभरापेक्षा अधिक काळापासून या जिलेटिन कांड्या आणि डेटोनेटर्स असलेली बॅग या दोसर भवन जवळ घरासमोरील जागेत सापडली. नेमक्या या जिलेटिन कांड्या आणि डेटोनेटर्स तिथे कशा पोहोचल्या याचा पोलीस तपास करत आहेत.



