
पुणे : सतत वाहतूक कोंडी होते, प्राणघातक अपघात होतात तेथे एकही पोलीस कर्मचारी नाही, आणि जेथून एकही वाहन धावत नाही तेथे ७ पोलीस कर्मचारी घोळका करून उभे असे चित्र बुधवारी दुपारी खराडीतील इऑन आय-टी पार्क रोडवर दिसले. बाजूच्या नगर – पुणे रोडवर एकही पोलीस कर्मचारी नसल्याने सतत होणारी वाहतूक कोंडी मात्र कायम होती.
कायद्यानुसार महाराष्ट्र राज्यात मोटर वाहन कायदा, १९८८ अन्वये वाहतुकीचे चलन (दंड) करण्याचा अधिकार पोलीस विभागातील हवालदार ते पोलीस उपनिरीक्षक आणि त्यावरील दर्जाच्या अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे कायदेशीर अधिकार आहेत. अशा परिस्थितीत केवळ एक दोन जणांच्या हाती यंत्र असताना टोळके करून संबंधित कर्मचारी कशासाठी थांबले आहेत याचे उत्तर पोलीस आयुक्त देतील काय?
‘पीटीपी ॲप’ च्या माध्यमातून बेशिस्त वाहनचालकांकडून ३ कोटी रुपयांपेक्षा अधिक दंड वसूल करण्यात आला आहे. स्वतः पोलीस आयुक्त अमितेशकुमार सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशीक विभाग मनोज पाटील वाहतूक शाखेचे उपायुक्त हिंमत जाधव आदी अधिकारी पुणे शहरातील वाहतूक सुधारण्यासाठी रात्रंदिवस झटत आहेत. अशा परिस्थितीत नागरिकही ‘पीटीपी ॲप’ साठी प्रामाणिकपणे काम करत असताना ज्यांच्यावर जबाबदारी आहे ते पोलीस कर्मचारी मात्र बेफिकीर असल्याचे संतापजनक चित्र दिसून आले.
चंदन नगर वाहतूक विभागांतर्गत, खराडी पोलीस स्टेशन समोरच्या रस्त्याने एकही वाहन दिसत नाही. दुपारी ४ ते ५ दरम्यान रस्ता पूर्ण मोकळा आहे. एकही वाहन रस्त्यावर नसताना ७ पोलीस एकाच ठिकाणी थांबून आहेत हे ‘ स्टींग ऑपरेशन’ द्वारे लक्षात आले. तसेच मोठ्या प्रमाणात वाहतूक बेशिस्त होण्यामागे मुख्य कारणही समोर आले.
या व्हिडिओ मध्ये चित्रण झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती कोठे होती हे तपासून त्यांच्यावर कारवाई होईल का? एखाद्या वाहतूक विभागात १५ ते २० कर्मचारी असतात. त्यापैकी ७ जण एकाच ठिकाणी घोळका करून थांबणार असतील तर मग का नाही वाहतूक बेशिस्त होणार किंवा कोंडी होणार ? एखाद्या चौकात चारही बाजूंनी पोलीस थांबले तर वाहतूक बेदरकार होणार नाही. लोकांचे बळी जाणार नाहीत, असे जागरूक नागरिकांना वाटते.
वाहतूक पोलीस कर्मचारी ज्यासाठी वेतन घेतात ते कामच करत नाहीत असे आढळून आले. या उलट या रस्त्याच्या जवळ असलेल्या पुणे – नगर रस्त्यावर प्राणघातक अपघात होत आहेत. या रस्त्यावर बेशिस्त डंपर चालकांनी धुमाकूळ घातला असून सारखे छोटे-मोठे अपघात होत असल्याने हा रस्ता मृत्यूचा सापळा बनत चाललेला आहे. अशा धोकादायक ठिकाणी कर्तव्य बजावण्याऐवजी वाहतूक पोलीस आडोशाला थांबून कोणते काम करत आहेत ? असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला असून संबंधितांना निलंबित करावे अशी मागणी पुढे आली आहे.
पोलीस आयुक्तांनी स्पष्ट सूचना दिल्या आहेत की कोणत्याही पोलीस कर्मचाऱ्यांनी ‘ड्युटी रोस्टर’ प्रमाणेच काम केले पाहिजे. तरीही नेमणुकीचे ठिकाण, ‘पाॅईंट’ सोडून पोलीस कर्मचारी वाहनचालकांना घाबरण्याचा प्रयत्न करतात. अवजड किंवा दुचाकी वाहनांना बाजूला घेऊन लायसन्स, पीयूसी आदी गोष्टींची चौकशी करून चूक काढत हजार, पाचशे रुपये उकळतात, असे या रस्त्यावर नेहमी जाणाऱ्या नागरिकांचे निरिक्षण आहे. एका स्थानिक नागरिकाने सांगितले की अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे. नागरिकांनी तक्रारी केल्या. अनेकांचा रोष होता. तरीही यांच्या कार्यपद्धतीत काही सुधारणा झाली नाही. अशा बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर पोलीस आयुक्त काय कारवाई करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



