अमेरिका इराणची इस्लामाबादमधील २१ तासांची चर्चा फिस्कटली
इराणने लावल्या अमेरिकेच्या अटी फेटाळून

इस्लामाबाद : इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात युद्धविराम झाल्यानंतर पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये आयोजित शांतता चर्चा फिस्कटली असल्याचे समोर आले आहे. या तिन्ही देशांच्या शिष्टमंडळात २१ तास चाललेली चर्चा निष्फळ ठरली असून कोणताही करार झालेला नाही. इस्लामाबादमध्ये तब्बल २१ तास चाललेली चर्चा कोणत्याही कराराशिवाय संपुष्टात आली असून ही बोलणी का फिस्कटली, यावर आता वॉशिंग्टन आणि तेहरानकडून परस्परविरोधी दावे केले जात आहेत.
घानामधील इराणच्या दूतावासाने एक्सवर एका पोस्टद्वारे माहिती दिली की, तेहरानने अमेरिकेच्या मागण्यांना “मोठा नकार” दिला आहे. वॉशिंग्टनवर आरोप करताना दूतावासाने म्हटले की, अमेरिका केवळ चर्चेतून बाहेर पडण्यासाठी “निमित्त शोधत” होती आणि ज्या सवलती त्यांना युद्धाद्वारे मिळवता आल्या नाहीत त्या ते आता मागण्यांतून मिळवू पाहत होते.
या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, अमेरिकन शिष्टमंडळ रिकाम्या हाती परतले असून होर्मुझची सामुद्रधुनी अजूनही बंदच आहे. इराणने आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटले की, त्यांनी अमेरिकेच्या अवाजवी मागण्या मान्य करण्यास नकार दिला असून, तेहरान आपल्या हितसंबंधांसाठी राजनैतिक प्रयत्न सुरूच ठेवेल.
मात्र अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. व्हॅन्स यांनी चर्चेनंतर पत्रकारांशी बोलताना वेगळी बाजू मांडली. इराणने अमेरिकेच्या अटी मान्य न केल्यामुळे कोणताही करार होऊ शकला नाही, असे त्यांनी सांगितले.
व्हॅन्स म्हणाले, “आम्ही कोणत्याही करारापर्यंत पोहोचलेलो नाही. त्यांनी आमच्या अटी स्वीकारण्यास नकार दिला आहे. प्रदीर्घ चर्चेनंतर अमेरिकेने आपली अंतिम आणि सर्वोत्तम ऑफर दिली होती आणि संपूर्ण वाटाघाटी दरम्यान अमेरिकेच्या शिष्टमंडळाने बरीच लवचिकता दाखवली होती.यातील मुख्य मुद्दा इराणच्या अणू कार्यक्रमाचाच आहे. तेहरान अण्वस्त्रे बनवणार नाही, याबाबत त्यांनी स्पष्ट आणि दीर्घकालीन वचनबद्धता द्यावी, अशी वॉशिंग्टनची मागणी आहे.
ते पुढे म्हणाले, “आम्हाला त्यांच्याकडून केवळ आत्तासाठीच नव्हे, तर दीर्घकाळासाठी एक सकारात्मक वचन हवे आहे.
पाकिस्तानच्या मध्यस्थीने झालेली ही चर्चा युद्धविराम टिकवून ठेवण्यासाठी आणि व्यापक कराराच्या दिशेने टाकलेले एक पाऊल होते. मात्र, दोन्ही देशांच्या विधानांतील तफावत पाहता, महत्त्वाच्या मुद्द्यांवर अद्याप मोठी दरी असल्याचे स्पष्ट होत आहे.



