लातूर

लातूर येथे स्वतंत्र विभागीय अप्पर आयुक्त कार्यालय सुरू करण्याबाबत शासन सकारात्मक

लातूर : लातूर येथे स्वतंत्र विभागीय अप्पर आयुक्त कार्यालय सुरु करण्यासंदर्भात लातूर जिल्ह्यातील भाजपचे आमदार अभिमन्यू पवार पाठपुरावा करत असून लातूरकरांची जिव्हाळ्याची मागणी सकारात्मकपणे घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उचित निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन पवार यांना दिले.

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांसाठी सध्या छत्रपती संभाजीनगर येथे एकच विभागीय आयुक्त कार्यालय कार्यरत असल्यामुळे लातूर, धाराशिव, नांदेड, बीड, हिंगोली येथील नागरिकांना प्रशासकीय कामांसाठी मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागते.

या पार्श्वभूमीवर पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत लातूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सविस्तर चर्चा झाली. लातूरमधील नागरिकांच्या सोयीसाठी अत्यावश्यक असलेले अप्पर विभागीय आयुक्त कार्यालय सुरू करण्यात यावे अशी विनंती केली असता त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचे ठोस आश्वासन दिले, असे पवार यांनी म्हटले आहे.

पवार यांनी सांगितले की नागरिकांना प्रशासकीय कामांसाठी मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच, शासनाने विभागीय आयुक्तालयाच्या विभाजनाची घोषणा केली असली तरी ती अद्याप प्रत्यक्षात आलेली नसल्याची बाबही त्यांच्या निदर्शनास आणून दिली. लातूरमध्ये विविध शासकीय विभागांची २५ पेक्षा अधिक कार्यालये कार्यरत असून, गेल्या १५ वर्षांपासून नागरिक स्वतंत्र विभागीय आयुक्तालयासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत, याकडेही फडणवीस यांचे लक्ष वेधले.

जनतेची व प्रशासनाची महसुली कामे सुलभ व्हावीत आणि होणारी गैरसोय दूर व्हावी, यासाठी लातूर येथे स्वतंत्र विभागीय आयुक्त कार्यालय मंजूर होईपर्यंत अप्पर विभागीय आयुक्त कार्यालय सुरू करण्यात यावे, अशी आग्रही विनंती त्यांना केली, असे पवार यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page