
मुंबई : मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल येथील वाढत्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून देशातील पहिल्या पॉड टॅक्सी प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. कुर्ला ते वांद्रे दरम्यान ७,८५ किमीचा हा प्रकल्प टप्प्याटप्प्याने पूर्ण होणार असून, २०२७ पासून पहिल्या टप्प्यात सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.
पॉड टॅक्सी ही पूर्णपणे स्वयंचलित, ड्रायव्हरलेस प्रणाली असून, एका पॉडमध्ये एकावेळी ६ प्रवासी प्रवास करू शकतील. या सेवेसाठी प्रति किमी सुमारे २१ रुपये दर आकारला जाणार असून, वांद्रे ते बीकेसी प्रवासासाठी अंदाजे ५० ते ७५ रुपये खर्च अपेक्षित आहे. दरवर्षी या दरात ४ टक्क्यांनी वाढ होणार असल्यामुळे हा पर्याय काहीसा महागडा ठरू शकतो.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे वाढत्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी हा प्रकल्प राबविण्यात येत असून या प्रकल्पांतर्गत कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानकांदरम्यान सुमारे ८.८५ किमी लांबीची पॉड टॅक्सी मार्गिका उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
या मार्गावर बीकेसीमधून जोडणी करण्यात येणार असून, हा प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर राबवला जाणार आहे.
या कामासाठी हैदराबादमधील साई ग्रीन मोबिलिटी कंपनीला कंत्राट देण्यात आले असून, पुढील २० महिन्यांत म्हणजेच २०२७ च्या अखेरीस पहिला टप्पा पूर्ण होण्याची शक्यता आहे.
पहिल्या टप्प्यात ३.३६ किमी लांबीच्या मार्गिकेवर पॉड टॅक्सी सेवा सुरू केली जाणार आहे. या टप्प्यात एकूण ८ स्थानकांचा समावेश असेल, ज्यामध्ये कुर्ला, एलबीएस मार्ग, बीडीबी गेट, वांद्रे पूर्व आणि बीकेसी परिसरातील महत्त्वाची ठिकाणे जोडली जातील. उर्वरित प्रकल्प पूर्ण होण्यासाठी मात्र २०३१ पर्यंत वाट पहावी लागणार आहे.



