आंतरराष्ट्रीय
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील मोठा अनर्थ सीक्रेट सर्व्हिसच्या तत्परतेमुळे टळला

वॉशिंग्टन : ‘वॉशिंग्टन हिल्टन’ हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक ‘व्हाईट हाऊस करस्पाँडंट्स डिनर’ दरम्यान गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली. गोळीबाराचा आवाज ऐकू येताच सीक्रेट सर्व्हिसच्या एजंट्सनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. वन्स यांना सुरक्षा कवचात घेऊन तातडीने रंगमंचावरून सुरक्षित स्थळी हलवले.
या घटनेमुळे कार्यक्रमात प्रचंड घबराट पसरली आणि उपस्थितांनी टेबलांखाली आसरा घेतला. पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेतले असून त्याची ओळख कोले टॉमस ॲलन (३१ वर्षे, कॅलिफोर्निया) अशी पटली आहे. हल्लेखोर बंदूक आणि चाकूने सज्ज होता. सुदैवाने, ट्रम्प आणि वन्स पूर्णपणे सुरक्षित असून एका सुरक्षा रक्षकावर गोळी झाडली गेली, मात्र बुलेटप्रूफ जॅकेटमुळे त्यांचा जीव वाचला आहे.



