आमदार संजय गायकवाड यांच्यावर शाहू महाराज छत्रपती संतप्त

कोल्हापूर: शिवाजी कोण होता? या पुस्तकाच्या शीर्षकावरुन कोल्हापूरमधील प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवीगाळ करुन त्यांना जीवे मारण्याची धमकी देणारे आमदार संजय गायकवाड यांच्याविषयी खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी संताप व्यक्त केला आहे. संजय गायकवाड यांनी केलेले वक्तव्य जनता सहन करणार नाही. कोणाबद्दल काय बोलायचे हे त्यांना समजायला हवे, असे शाहू महाराज छत्रपती यांनी म्हटले. ते कोल्हापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
त्यांनी संजय गायकवाड यांच्याविरोधात कठोर कारवाईची गरज व्यक्त केली. यासंदर्भात सरकारला जी योग्य वाटले, ती कारवाई लवकर करावी. या सरकारमध्ये काही गोष्टी लगेच होत नाहीत. आमदारकी रद्द करण्यासंदर्भात काय नियम आहेत हे मला माहीत नाही. मात्र, संजय गायकवाड यांनी ज्या तऱ्हेने त्यांनी वक्तव्य केले ते बिलकुल योग्य नाही. संजय गायकवाड यांच्या वक्तव्याकडे जनताच आता लक्ष देईल, अशी प्रतिक्रिया शाहू महाराज छत्रपती यांनी व्यक्त केली.
दरम्यान, पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांनी याप्रकरणी गुरुवारी कोल्हापूरच्या राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र, पोलिसांनी तुर्तास संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करुन घेण्यास नकार दिला. आम्ही आमच्या वकिलांशी बोलून तुम्हाला कळवतो, असे पोलिसांनी प्रशांत आंबी यांना सांगितले.
शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केलीच पण त्यांची भाषा अत्यंत घाणेरडी, विकृत व गुन्हेगारी प्रवृत्तीची आहे. आमदार गायकवाड यांनी यावेळी कॅाम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येबाबतही भाष्य केलेले आहे, अशा विकृत व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आमदारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कारवाई करण्यास का घाबरतात?, असा प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुंबई येथे विचारला.
गांधी भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, आमदार संजय गायकवाड हे सातत्याने दादागिरी व गुंडगिरी करत असतात. आमदार कॅटिंनमध्ये कामगारांना मारहाण करणे, बुलढाण्यात वाळू तस्करी, जबरदस्तीने जमीन बळकावणे, कोणालाही अत्यंत खालच्या भाषेत शिविगाळ करणे, ही त्यांची गुन्हेगारी कृत्त्ये सुरुच आहेत. एवढेच काय तर भाजपा हा हिजड्यांचा पक्ष आहे, देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोरोनाचे जंतू सोडा, राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्यास १० लाखांचे बक्षीस देऊ, असे प्रताप या आमदार महोदयांनी यापूर्वी केले आहेत. फडणवीस यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी त्यांच्या पक्षाला दिलेल्या शिव्यांची तरी दखल घेऊन आमदार संजय गायकवाड यांच्यावर कठोर कारवाई करायला हवी, पण मुख्यमंत्री मात्र याला आमदाराला पाठीशी घालत आहेत, असे सपकाळ म्हणाले.



