मुंबई

माजी सैनिकांच्या कल्याणासाठी मेस्को महामंडळ अधिक बळकट करण्यावर भर 

मंत्री शंभूराज देसाई यांचे वक्तव्य 

मुंबई : माजी सैनिकांच्या सर्वांगीण कल्याणासाठी महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ अधिक सक्षम, परिणामकारक पद्धतीने कार्यरत करण्यावर भर देण्यात आला. माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी, सेवा वितरणातील गती, पारदर्शकता आणि तळागाळापर्यंत लाभ पोहोचविण्यास प्राधान्य देण्याच्या सूचना माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.

मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळाची वार्षिक सर्वसाधारण बैठक उत्साहपूर्ण आणि सकारात्मक वातावरणात पार पडली. यावेळी मेस्कोचे व्यवस्थापकीय संचालक कॅप्टन कौस्तुभ गोसावी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत मेस्कोचे व्यवस्थापकीय संचालक कॅप्टन गोसावी यांनी महामंडळाच्या विविध उपक्रमांचा, योजनांच्या अंमलबजावणीचा तसेच प्रशासकीय कामकाजाचा सविस्तर आढावा सादर केला.

यावेळी मंत्री देसाई यांनी महामंडळाच्या कामकाजात अधिक परिणामकारकता आणण्यासाठी विविध महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.

माजी सैनिकांच्या गरजा आणि अपेक्षा लक्षात घेऊन योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करावा, तसेच सेवा वितरणात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवावी, असे त्यांनी निर्देशित केले.

माजी सैनिकांना रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध विभाग, संस्था आणि उद्योग क्षेत्राशी समन्वय वाढवून ठोस कृती आराखडा तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

महामंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत आणि प्रभावीपणे पोहोचण्यासाठी यंत्रणेला अधिक सक्षम करावे, तसेच तक्रार निवारण प्रणाली अधिक बळकट करण्यावर भर द्यावा, असेही मंत्री महोदयांनी सांगितले.

बैठकीदरम्यान मेस्को महामंडळाच्या कामकाजाला अधिक मजबूती देण्यासाठी प्रशासकीय आणि धोरणात्मक पातळीवरील आवश्यक बाबींवर सकारात्मक चर्चा झाली. माजी सैनिकांच्या हितासाठी शासन कटिबद्ध असून, महामंडळाने त्या दृष्टीने अधिक सक्रिय, संवेदनशील आणि उत्तरदायी भूमिका बजावावी, अशी अपेक्षा मंत्री देसाई यांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page