मुंबई

मुंबईत विषबाधेतून एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू 

मुंबई: रात्रीच्या जेवणानंतर कलिंगड खाल्ल्यामुळे झालेल्या विषबाधेतून एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला मुंबईतील पायधुनी परिसरात ही दुर्घटना घडली.

अब्दुल्ला डोकाडिया (४०), त्यांच्या पत्नी नसरीन (३५), मुलगी आयशा (१६) आणि जैनब (१३) अशी मृतांची नावे आहेत.

२५ एप्रिल रोजी रात्री १०.३० च्या सुमारास यांनी आपल्या नातेवाईकांसोबत रात्रीचे जेवण केले होते. या जेवणात बिर्याणीचा बेत होता. हे जेवण आटोपून त्यांचे नातेवाईक आपापल्या घरी निघून गेले. त्यानंतर रात्री १ ते १.३० च्या सुमारास कुटुंबातील या चारही सदस्यांनी कलिंगड खाल्ले. त्यानंतर काही तासांनी या चौघांची प्रकृती बिघडण्यास सुरुवात झाली.

यानंतर २६ एप्रिल रोजी पहाटे ५.३० ते ६ च्या दरम्यान कुटुंबातील सर्वांना उलट्या आणि जुलाबाचा तीव्र त्रास सुरू झाला. प्रकृती चिंताजनक झाल्यामुळे त्यांना तातडीने जे.जे. रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्रकृती अधिकच खालावली. यावेळी सर्वात आधी जैनब (१३) यांचा सकाळी १०.१५ वाजता मृत्यू झाला. त्यानंतर दिवसभरात पत्नी आणि मोठी मुलगी यांचा मृत्यू झाला. त्यानंतर रात्री १०.३० च्या सुमारास कुटुंबप्रमुख अब्दुल्ला यांनीही प्राण सोडले.

जे.जे. मार्ग पोलिसांनी अपघाती मृत्यू म्हणून नोंद केली आहे. प्राथमिक संशयानुसार, बिर्याणी आणि कलिंगड यांच्या एकत्रित सेवनामुळे ही विषबाधा झाली असावी, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र, पोलिसांनी सर्व शक्यता लक्षात घेऊन तपास सुरू केला आहे. त्यांच्या अन्नात काही विषारी पदार्थ मिसळले गेले होते का, याचाही शोध घेतला जात आहे.

सध्या या चौघांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून, मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी हिस्टोपॅथॉलॉजी अहवालाची प्रतीक्षा केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page