सुनेत्रा अजित पवार यांचा ४४ हजार ७९६ मते घेत एकतर्फी विजय
बारामतीकरांनी मतांमधून दाखवलेला विश्वास अजितदादांच्या पवित्र स्मृतींना समर्पित - सुनेत्रा वहिनी

मुंबई : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होत असताना आपण सर्वांनी आपल्या मतांमधून दाखवलेला विश्वास आदरणीय अजितदादांच्या पवित्र स्मृतींना समर्पित करते अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांनी ‘एक्स’ वर ट्वीट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पाचव्या फेरी अखेर ४४ हजार ७९६ मते मिळवून सुनेत्रा पवार यांनी विजय निश्चित केला. प्रतिस्पर्धी उमेदवारांना या फेरीपर्यंत २ आकडी मतेही मिळू शकली नाहीत.
आजचा हा निकाल जाहीर होत असताना आदरणीय दादांच्या आठवणींना उजाळा मिळाल्याने आपण सर्वजण भावूक आहोत. दादांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना, या विजयाचा जल्लोष म्हणून कुणीही मिरवणुका काढू नयेत किंवा गुलाल उधळू नये. आपण संयम राखूया आणि दादांच्या विचारांना साजेसे वर्तन करूया अशी विनंती सुनेत्रा अजित पवार यांनी केली आहे.
दादांच्या स्वप्नातील बारामती घडवण्याची संधी दिल्याबद्दल सर्व बारामतीकरांचे मनःपूर्वक आभार मानतानाच हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे. निर्धाराची, संघर्षाची आणि नव्या बारामतीची.. ! असा विश्वासही सुनेत्रा अजित पवार यांनी बारामतीकरांना दिला आहे.



