सोन्या, चांदीच्या दरात मोठी वाढ

जळगाव : जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या किमतीने १ लाख ७ हजारांचा टप्पा ओलांडला आहे, जो विक्रमी आहे. गेल्या २४ तासांत सोन्यात ११०० रुपयांची आणि चांदीत ३००० रुपयांची वाढ झाली आहे.
सध्या सणासुदीच्या काळात तर सोने खरेदीला उधाण आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून सटासट वाढत जाणारे सोन्याचे दर पाहून छाती दडपून जाते, पण सोनखरेदीचा लोकांचा उत्साह काही कमी होती नाही. त्यामुळे हाच ट्रेंड कायम राखत आजही सोन्या-चांदीच्या दरात चांगलीच वाढ झाली असून अवघ्या २४ तासांत सोन्याची किंमतीने उच्चांक गाठला आहे.
जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या आणि चांदीच्या दारात १ सप्टेंबर रोजी पुन्हा मोठी वाढ झाली असून सोन्या-चांदीचे दर विक्रमी उच्चांकावर पोहोचले आहेत. सध्या जीएसटीसहित सोन्याचे दर प्रती तोळा १ लाख ७ हजार ७३८ रुपयांवर पोहोचले आहेत. तर चांदीची किंमत जीएसटी सहित प्रति किलो १ लाख २७ हजार ७२० रुपयांवर गेली आहे. थक्क करणारे हे भाव असूनही खरेदीसाठी अनेक ठिकाणई झुंबड उडाल्याचे दिसत आहे.
गेल्या चार ते पाच दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दारात सातत्याने मोठी वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसात सोन्याच्या दरात तब्बल ३ हजार रुपयांनी तर चांदीच्या दरात ६ हजारांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सोनं आणि चांदीचे भाव वाढता वाढता वाढे, असेच आहेत.



