Uncategorized

बाजार समितीतून राष्ट्रवादीचा बाजार उठला

महाराष्ट्र मिशन विशेष, संपादकीय 

महाराष्ट्र मिशन विशेष, संपादकीय 

महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातील १४७ कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी निवडणूका झाल्या. ग्रामीण भागांमध्ये स्थानिक राजकारणावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या किल्ल्या हाती असणे नेतेमंडळींना फायदेशीर. बाजार समितीशी शेतकऱ्यांचा दैनंदिन संबंध येत असतो. या माध्यमातूनच लोकसभा, विधानसभा किंवा जिल्हा परिषद निवडणुकांसाठीचा आगामी रंगढंग समजू शकतो. पुणे जिल्हातच नव्हे तर आशिया खंडात श्रीमंत बाजार समिती असा पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचा लौकिक. तिच्या निवडणुकीचा निकाल पाहता ग्रामीण, सहकारी राजकारणात भाजपचा शिरकाव हा राष्ट्रवादीच्या भविष्यातील राजकारणासाठी धोकाच. विधानसभा निवडणुकीची लढाई कशी होईल याची चुणूकही या निवडणुकांमुळे आली. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादीला मोठा दणका दिला. भाजप नेते, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (पीडीसीसी) संचालक विकास दांगट पाटील यांच्या नेतृत्वाखालच्या पॅनेलने सोसायटी मतदार संघात अकराच्या अकरा जागा जिंकल्या. राष्ट्रवादीला कात्रजचा घाट दाखवला. या दोघांसह प्रा. के.डी. कांचन, बाजार समितीचे माजी अध्यक्ष दिलीप काळभोर, रोहिदास उंद्रे, प्रकाश जगताप, प्रशांत काळभोर यांच्या नेतृत्वाखालच्या अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी पॅनेलने पंधरापैकी तब्बल तेरा जागा जिंकून नवा इतिहासच घडवला. विरोधी पक्षनेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरच्या मैदानावर ही निवडणूक झाली. पुणे जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या, या संचालक मंडळांच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला. कंद व दांगट पाटील यांच्या नेतृत्वाखालच्या अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी पॅनेल या सर्वपक्षीय पॅनेलने, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनेलचा १३ विरुद्ध २ असा दणदणीत पराभव केला. समोर खुद्द‌ अजित पवारांसह त्यांचे चार विद्यमान आमदार निवडणुकीसाठी झटत असलेले. असे असतानाही कंद व दांगट पाटील या दोघांनी या राजकीय कुस्तीत राष्ट्रवादीला धूळ चारली. या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक पराभव अजित पवारांचे खंदे समर्थक आणि महाराष्ट्र केसरी राहुल काळभोरांचा. ग्रामपंचायत गटातून भाजपचे जिल्हा सरचिटणीस सुदर्शन चौधरी यांनी काळभोरांचा बावीस मतांनी पराभव केला. काळभोरांचे सगेसोयरे व अजित पवार, प्रदीप कंद, आमदार राहुल कुल यांच्याशी असलेली जवळीक यामुळे काळभोर यांचा विजय पक्का मानला जात होता. काळभोरांच्या बरोबरच या निवडणुकीत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे माजी संचालक प्रकाश म्हस्के यांचे बंधु शेखर सहदेव म्हस्के, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य संतोष आबासाहेब कांचन, अशोक सुदाम गायकवाड, योगेश बाळासाहेब शितोळे, दत्तात्रय दिनकर चोरघे, कुलदीप गुलाबराव चरवड, संदीप माणिकराव गोते, प्रतिभा महादेव कांचन, सरला बाबुराव चांदेरे या राष्ट्रवादीच्या भल्या भल्या उमेदवारांना पराभवाची चव चाखावी लागली. हे सारे माजी संचालकांचे सोयरेधायरेच. म्हणजे जुनेच लोक फक्त नवे चेहरे घेऊन बसणार. म्हणजे पुन्हा जुन्याच गडबडींना वाव. या बहुचर्चित समितीच्या सत्तेच्या चाव्या आपल्या हातात याव्यात म्हणून आमदार अशोक पवार, आमदार चेतन तुपे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, प्रकाश म्हस्केंसह राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांनी कंबर कसली होती. मात्र ग्रामपंचायत गटातील केवळ दोन जागा वगळता त्यांच्या हातात धुपाटणे आले. त्यांचा बाजार उठला. इंदापूर व बारामती तालुक्याच्या मंडळीनी हवेली तालुक्यावर आजपर्यंत केलेल्या अन्यायाला वाचा फोडली जाऊन हवेली तालुका कोणाला बधत नाही हे पण दिसून आले. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या दहा महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत सर्वपक्षीय उमेदवार विकास दांगटांनी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, बाजार समितीचे माजी अध्यक्ष दिलीप काळभोर, रोहिदास उंद्रे, प्रकाश जगताप,प्रशांत काळभोर यांना हाताशी धरले. दणकेबाज विजय मिळवला. हाच धागा पकडत दांगट पाटलांचे सहकारी परत एकदा एकत्र आले. त्यांनी सर्वपक्षीय अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी पॅनेलच्या माध्यमातून बाजार समितीच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. त्यांनी निवडून आणलेले बरेचसे चेहरे नवे आणि पाटी कोरी असलेले. त्यामुळे शेतकरी,हमाल यांच्या ‌भल्यासाठी काही केले जाईल अशी आशा निर्माण झाली आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या मुंबई, नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक या स्थानिक राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या निवडणुकांमध्ये दादा भुसे, संजय राठोड, डॉ. विजयकुमार गावित या विद्यमान मंत्र्यांबरोबरच पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, जयदत्त क्षीरसागर या माजी मंत्र्यांसह काही प्रस्थापित नेत्यांनाही धक्का बसला. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते निष्कामी ठरले. हिंगोलीत भाजप सोबत दोन्ही शिवसेनांनी एकत्र येणं विशेष. कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे महत्त्व माहिती असल्याने निवडणुकांमध्ये सर्वच नेतेमंडळींनी विशेष रस घेतला होता. अशोक चव्हाण, जयंत पाटील यांच्यासह काही नेते आपापल्या भागात ठाण मांडून बसले. पश्चिम महाराष्ट्रातल्या उर्वरित नगर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील बाजार समिती निकालात प्रस्थापितांनी गड राखल्याचे दिसत आहे. नगरमध्ये कर्डिले, थोरातांनी गड राखले. सोलापुरात मोहिते-पाटील, करमाळा – माढ्यात शिंदे बंधू, मंगळवेढ्यात अवताडे, पंढरपूरमध्ये परिचारक गटाने सत्ता राखली. मराठवाड्यात अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का पचवावा लागला. परळी व अंबाजोगाईमध्ये पंकजा मुंडेना धक्का देत धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादी महाविकास आघाडीचे वर्चस्व मिळवले. बीडमध्ये राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागरांनी काका जयदत्त क्षीरसागरांची ४० वर्षांची सत्ता उलथवून टाकली. धाराशिव मध्ये आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रा. तानाजी सावंत यांना परांडा बाजार समितीत धक्का बसला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page