युद्धामुळे भारतातील अनेक भागात विरोध प्रदर्शन; गृहमंत्रालयाकडून सर्व राज्यांना पत्र लिहून सतर्क राहण्याचे आदेश

नवी दिल्ली : इराणविरुद्ध इस्रायल अमेरिका यांच्यातील युद्धामुळे मध्य पूर्वेतील तणाव वाढला आहे. अमेरिका, इस्रायल, तेहरानसह अनेक बड्या शहरात सातत्याने बॉम्ब हल्ले करत आहे. तेहरानमध्ये सर्वात जास्त नुकसान झाल्याचे दिसून येते. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. त्यामुळे इराण बदला घेण्याच्या मानसिकतेत आहे. इराणने इस्रायलसह ९ देशांना टार्गेट बनवले आहे.
इराणशिवाय अन्य देशातही खामेनेई यांच्या मृत्यूविरोधात प्रदर्शने सुरू आहेत. त्यात भारत सरकारच्या गृह मंत्रालयानेही सर्व राज्यांना पत्र लिहून अलर्ट केले आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, इराणवर अमेरिका आणि इस्रायल हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतात संभाव्य हिंसाचारापूर्वी सतर्क राहा. २८ फेब्रुवारीला हे पत्र प्रसारित केले होते. ज्यात राज्यांना भडकाऊ भाषण देणा-या इराणी कट्टर समर्थकांची ओळख पटवा असे सांगितले होते. या पत्रात मध्य पूर्व आशियात सुरू असणा-या युद्धानंतर भारतातील अनेक भागात होणा-या विरोध प्रदर्शनाबाबत सतर्क केले आहे.
कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनाबाबतही पत्रात उल्लेख करण्यात आला आहे. दरम्यान, खामेनी यांच्या मृत्यूनंतर भारतात रस्त्यावर उतरणा-या लोकांमुळे सरकारने खबरदारीचे पाऊल उचलले आहे. जम्मू काश्मीरच्या श्रीनगर भागात सरकारकडून निर्बंध लावण्यात आलेत. ज्या भागात लोकांनी उतरून खामेनी यांच्या मृत्यूबद्दल आक्रोश केला त्या लाल चौकातील परिसर प्रशासनाकडून सील करण्यात आला आहे. क्लॉक टॉवरच्या आसपासही सुरक्षा व्यवस्था कठोर करण्यात आली आहे. सोबतच शाळा आणि कॉलेज पुढील २ दिवस बंद ठेवण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. काश्मीरमधील विद्यापीठांच्या परीक्षाही स्थगित करण्यात आल्या आहेत.



