महाराष्ट्र विधान परिषदेच्या १६ जागांसाठी निवडणूक जाहीर; १८ जूनला मतदान, २२ जूनला निकाल!

मुंबई: केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेतील रिक्त झालेल्या १६ जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या जागांवर कार्यरत असलेल्या सदस्यांचा कार्यकाळ अलीकडेच वेगवेगळ्या तारखांना संपुष्टात आल्यामुळे या निवडणुका घेतल्या जात आहेत. निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार, २५ मे रोजी निवडणुकीची अधिकृत अधिसूचना जारी केली जाईल. उमेदवारांना १ जूनपर्यंत आपले उमेदवारी अर्ज दाखल करता येतील, तर ४ जूनपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुभा असेल.
या १६ जागांसाठी १८ जून रोजी सकाळी ८:०० ते दुपारी ४:०० या वेळेत मतदान पार पडेल, तर २२ जून रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केले जातील. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया २५ जूनपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या निवडणुकीत सोलापूरमधून प्रशांत परिचारक, अहमदनगरमधून अरुणकाका जगताप, ठाण्यातून रवींद्र पाठक, जळगावमधून चंदूभाई पटेल, सांगली-साताऱ्यातून मोहनराव कदम, नांदेडमधून अमरनाथ राजूरकर, यवतमाळमधून दुष्यंत चतुर्वेदी, पुण्यातून अनिल भोसले, भंडारा-गोंदियातून प्रणय फुके, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून अनिकेत तटकरे, नाशिकमधून नरेंद्र दराडे, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोलीमधून रामदास आंबटकर, अमरावतीमधून प्रवीण पोटे, उस्मानाबाद-लातूरमधून सुरेश बीरदास, परभणी-हिंगोलीमधून विप्लव बजोरिया आणि औरंगाबाद-जालनामधून अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपलेल्या जागांचा समावेश आहे. दरम्यान, भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेवर निवड झाल्यामुळे २३ नोव्हेंबर २०२४ रोजी रिक्त झालेल्या ‘नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघा’च्या जागेसाठीही १८ जून रोजीच पोटनिवडणूक घेतली जाणार असून, तिचा निकालही २२ जून रोजी जाहीर केला जाईल.



