पुणे शहर

नीलम गोऱ्हे यांचे नाव खरात प्रकरणात येणे दुर्दैवी; रुपाली चाकणकरांवर गुन्हा दाखल करा – प्रा. श्याम मानव

पुणे, दि. १८ (प्रतिनिधी):

“पुण्यात एकेकाळी बुवाबाजीची भांडाफोड करण्यासाठी मी, जयदेव डोळे आणि नीलम गोऱ्हे पुढाकार घेत असू. मात्र, आज त्याच नीलम गोऱ्हे यांचे नाव खरात प्रकरणात येणे अत्यंत दुर्दैवी आहे,” अशी खंत अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक राष्ट्रीय संघटक प्रा. श्याम मानव यांनी आज येथे व्यक्त केली.

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आयोजित ‘बुवा तेथे बाया’ या विशेष अभियानांतर्गत ‘खरातसारख्या भोंदू बाबाला स्त्रिया का फसतात?’ या विषयावर प्रा. श्याम मानव यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक टिळक स्मारक मंदिर येथे झालेल्या या कार्यक्रमात ते बोलत होते.

रुपाली चाकणकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

आपल्या व्याख्यानात प्रा. श्याम मानव यांनी अशोक खरात प्रकरणावरून तीव्र संताप व्यक्त केला. “अशोक खरात या भोंदू बाबाचा भांडाफोड करण्याचा प्रयत्न एका पत्रकाराने केला होता. मात्र, त्याला धमकी देऊन खरात याला प्रत्यक्ष साथ दिल्याबद्दल रुपाली चाकणकर यांच्यावर जादूटोणा विरोधी कायद्यानुसार तात्काळ गुन्हा दाखल झालाच पाहिजे,” अशी आक्रमक मागणी प्रा. मानव यांनी यावेळी केली.

‘बुवा तेथे बाया’ अभियानाचा १२ वा टप्पा

या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे विश्वस्त अन्वर राजन यांच्या हस्ते पार पडले. व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) प्रवक्ते विकास लवांडे, समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष मधुकर कांबळे आणि कार्याध्यक्ष सुरेश झुरमुरे प्रामुख्याने उपस्थित होते.

प्रास्ताविकात मधुकर कांबळे यांनी सांगितले की, “गेल्या ११ एप्रिलपासून ‘बुवा तेथे बाया’ या विरोधी अभियानाची सुरुवात झाली असून, त्यातील हे १२ वे व्याख्यान पुण्यात होत आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीची गेल्या ४४ वर्षांपासून अथक वाटचाल सुरू असून, आतापर्यंत अनेक भोंदू बाबा आणि बुवांचा भांडाफोड करण्यात आला आहे.” तर अभियान प्रमुख सुरेश झुरमुरे यांनी, “देवधर्माच्या नावाखाली बुवा आणि बाबांकडून जे आर्थिक व शारीरिक शोषण केले जाते, त्यालाच समितीचा मुख्य विरोध आहे,” असे स्पष्ट केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन समितीच्या पुणे अध्यक्षा संध्या बागवे यांनी केले. यावेळी जिल्हा संघटक सुनील भालेराव, पांडुरंग सावंत आणि गोविंद एकबोटे यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचे ‘शिवाजी कोण होता’ हे विचारप्रवर्तक पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले. या व्याख्यानाला पुणेकरांची मोठी उपस्थिती लाभली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page