मुंबई

भ्रामक जाहिराती आणि अवैध औषध विक्रीविरोधात FDA चा एल्गार; राज्यभरातून ७३ लाखांचा साठा जप्त, आयुक्त तुकाराम मुंढेंचा थेट न्यायालयीन कारवाईचा इशारा!

विशेष प्रतिनिधी, मुंबई : राज्यातील जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या औषध माफिया आणि भ्रामक जाहिराती करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध अन्न व औषध प्रशासनाने (FDA) आतापर्यंतची सर्वात मोठी आणि धडक कारवाई केली आहे. राज्याचे एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ७ जिल्ह्यांतील १२ आयुर्वेदिक औषधविक्री आस्थापनांवर छापे टाकून तब्बल ७३ लाख २४ हजार ६५६ रुपये किमतीचा आक्षेपार्ह व मिसब्रँडेड औषध साठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे औषध निर्मिती आणि विक्री क्षेत्रातील अनधिकृत कृत्य करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

दिव्या फार्मसी’ला मोठा दणका; विभागनिहाय कारवाईचा आकडा

‘औषधे व जादूटोणाविरोधी (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा १९५४’ चे उल्लंघन केल्याप्रकरणी उत्तराखंडमधील प्रसिद्ध ‘मे. दिव्या फार्मसी, हरिद्वार’ या उत्पादकाच्या औषध साठ्यावर राज्याच्या विविध भागांत मोठ्या प्रमाणावर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.

विभागनिहाय जप्त करण्यात आलेला साठा पुढीलप्रमाणे

◾पुणे विभागामध्ये २ एलोपॅथी मिसब्रँडेड औषधांचा तब्बल २१ लाख ८३ हजार ४२८ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.

◾कोकण विभागातून मे. दिव्या फार्मसी, हरिद्वार या उत्पादकाच्या औषधांचा १८ लाख ५८ हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला, तर पुणे विभागातून याच उत्पादकाचा १४ लाख ६८ हजार ९८१ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.

◾नागपूरमध्ये ७ लाख २६ हजार ७५५ रुपयांचा, नाशिकमध्ये ७ लाख १० हजार ९४५ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.

◾बृहन्मुंबईमध्ये १ लाख ८५ हजार ६०० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.

◾अमरावतीमध्ये १ लाख ४२ हजार २२९ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.

◾ छत्रपती संभाजीनगरमध्ये ४८ हजार ७१८ रुपयांचा दिव्या फार्मसीच्या औषधांचा साठा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी जप्त करण्यात आला आहे.

“कोणतीही सवलत नाही, थेट कोर्टात खेचणार!” – तुकाराम मुंढे

आपल्या कडक शिस्तीसाठी ओळखले जाणारे एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या कारवाईनंतर अत्यंत कडक भूमिका घेतली आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की,

“सुरक्षित अन्न आणि औषध हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. भ्रामक व दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध करणे आणि अवैध औषध उत्पादन व विक्रीविरुद्धची कारवाई यापुढे अधिक कठोर आणि सातत्यपूर्ण असेल. ‘औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४०’ चे उल्लंघन करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही, त्यांच्यावर थेट न्यायालयीन कारवाई केली जाईल.”

सेल्फ मेडिकेशन’ टाळा; तक्रारदारांची माहिती राहणार गुप्त

औषधांच्या भ्रामक जाहिरातींना बळी पडून नागरिक स्वतःच्या मनाने औषधोपचार (Self-Medication) करतात, ज्यामुळे आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे नागरिकांनी अशा उत्पादनांवर विश्वास न ठेवता थेट प्रशासनाकडे तक्रार करावी, असे आवाहन सह आयुक्त (औषधे) गणेश रा. रोकडे यांनी केले आहे. तक्रार करणाऱ्या नागरिकांचे नाव आणि पत्ता पूर्णपणे गोपनीय ठेवला जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

डिजिटल पाऊल: लवकरच येत आहे नवीन मोबाईल ॲप!

नागरिकांना अवैध औषधे किंवा संशयास्पद साठ्याबाबत तक्रार करणे सोपे व्हावे, यासाठी एफडीआयेतर्फे लवकरच एक नवीन मोबाईल ॲप विकसित केले जात आहे. तसेच एक टोल-फ्री क्रमांक देखील कार्यान्वित करण्यात आला आहे.

तक्रार कशी करावी?

◾औषधाच्या दर्जाबाबत शंका असल्यास त्वरित एफडीएकडे संपर्क साधावा.

◾तक्रार करताना आपले नाव, पत्ता, संपर्क क्रमांकासह संशयित दुकानाचा/संस्थेचा अचूक पत्ता आणि औषधाचे नाव स्पष्टपणे नमूद करावे.

FDA ची ही धडक मोहीम केवळ तात्पुरती कारवाई नसून, ग्राहकांच्या आरोग्याचे रक्षण करणारी एक मोठी चळवळ ठरणार आहे. आयुर्वेदिक औषधांच्या नावाखाली सुरू असलेल्या भ्रामक जाहिरातींच्या बाजाराला लागलेला हा मोठा ब्रेक असून, आगामी काळात ही मोहीम अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page