मराठवाडा-विदर्भाचा बळीराजा इंधनासाठी वणवण; वाशिममध्ये मंत्री संजय राठोड यांचा मात्र ‘हेलिकॉप्टर’ अन् ‘२२ गाड्यांचा’ सुलतानी थाट!”

विशेष प्रतिनिधी, महाराष्ट्र मिशन वाशिम : एककीडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने शासकीय खर्चात काटकसर करण्याचे आणि इंधन बचतीचे (Fuel Conservation) आवाहन करत आहेत, तर दुसरीकडे महाराष्ट्रात मात्र मंत्र्यांकडूनच या आवाहनाची सर्रास पायमल्ली होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे चक्क हेलिकॉप्टरने येत आणि त्यानंतर तब्बल २२ गाड्यांचा अवाढव्य ताफा बाळगत ‘व्हीआयपी’ संस्कृतीचे जाहीर प्रदर्शन केले आहे. या व्हीआयपी थाटाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, जनतेतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंत्री संजय राठोड हे नागपूरहून वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजाची काशी समजल्या जाणाऱ्या पोहरादेवी गडावर आले होते. नागपूर ते वाशिम हे अंतर फार नसतानाही त्यांनी या प्रवासासाठी व्हीआयपी हेलिकॉप्टरचा वापर केला. इतकेच नव्हे तर, हेलिकॉप्टरमधून उतरल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी आणि सुरक्षेसाठी शासकीय आणि खाजगी वाहनांची जणू काही लांबच लांब रांगच लागली होती. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, लाल-निळे दिवे असलेल्या शासकीय गाड्या आणि अनेक महागड्या एसयूव्ही (SUVs) अशा तब्बल २२ गाड्यांचा ताफा रस्त्यावरून धुळ उडवत जात आहे. एका मंत्र्यासाठी अवघ्या काही किलोमीटरसाठी शेकडो लीटर इंधनाचा हा असा मुक्तहस्ते अपव्यय करण्यात आला.
विदर्भ-मराठवाड्यात शेतकरी डिझेलसाठी वणवण!
एककीडे मंत्री महोदय शासकीय पैशांवर इंधनाची ही अशी उधळपट्टी करत असताना, दुसरीकडे याच विदर्भ आणि मराठवाड्यातील खरीप हंगामाचे वास्तव अत्यंत भीषण आहे. शेतीच्या मशागतीसाठी, नांगरणी आणि वखरणीसाठी शेतकऱ्यांना ट्रॅक्टर चालवायला डिझेल मिळेनासे झाले आहे. अनेक भागांत डिझेलच्या टंचाईमुळे आणि गगनाला भिडलेल्या दरांमुळे गरिबांचे ट्रॅक्टर शेतातच उभे आहेत. वेळेत मशागत न झाल्यास पेरण्या लांबतील आणि उत्पादन घटेल, या भीतीने बळीराजा हवालदिल झाला आहे.
पोशिंदा उपेक्षित, मंत्री सुरक्षित?
ज्या शेतकऱ्याच्या घामावर देशाची अर्थव्यवस्था चालते, त्याला स्वतःच्या शेतात ट्रॅक्टर चालवायला डिझेल मिळवण्यासाठी प्रशासनाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. आणि दुसरीकडे, जनतेच्याच करातून गोळा झालेल्या पैशांवर मंत्री आणि त्यांचे कार्यकर्ते २२ गाड्यांमधून हवेत मिरवत आहेत. पंतप्रधानांच्या ‘इंधन बचती’च्या घोषणा फक्त सर्वसामान्यांसाठीच आहेत का? मंत्र्यांना या नियमांतून सूट आहे का? असा संतप्त सवाल आता ‘महाराष्ट्र मिशन’च्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकरी विचारत आहे.
या बेजबाबदार आणि व्हीआयपी संस्कृतीच्या अवाजवी बडेजावावर आता विरोधक आणि सामाजिक संघटना काय भूमिका घेतात आणि सरकार यावर काही कारवाई करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



