
विशेष प्रतिनिधी मुंबई/पुणे : अकरावी आणि बारावीच्या वर्गांमधील विद्यार्थ्यांची घटती उपस्थिती आणि वाढती ‘दांडी बहाद्दर’ प्रवृत्ती रोखण्यासाठी शिक्षण विभागाने एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये (Junior Colleges) आता विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यात येणार आहे. एवढेच नव्हे, तर विद्यार्थी वर्गात उपस्थित आहेत की नाही, हे तपासण्यासाठी आता सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यांची करडी नजर असणार आहे.
कोचिंग क्लासेस आणि ‘डमी ॲडमिशन’ला मोठा दणका
गेल्या काही वर्षांत अनेक विद्यार्थी केवळ नावापुरते कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतात आणि वर्षभर कॉलेजला न जाता खासगी कोचिंग क्लासेस किंवा JEE, NEET, CET च्या तयारीसाठी क्लासेसमध्येच पूर्ण वेळ घालवतात, अशा तक्रारी शिक्षण विभागाकडे सातत्याने येत होत्या. अनेक महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेसच्या छुप्या युतीमुळे (Tie-ups) कॉलेजेसमध्ये शुकशुकाट पाहायला मिळत होता. शिक्षण विभागाच्या या नव्या निर्णयामुळे या ‘डमी ॲडमिशन’ प्रवृत्तीला आणि कोचिंग क्लासेसच्या मनमानीला मोठा चाप बसणार आहे.
माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची आणि कॉलेजची शिस्त निर्माण करणे हा या निर्णयाचा मुख्य हेतू आहे.
बायोमेट्रिक हजेरी:विद्यार्थ्यांना रोज कॉलेजमध्ये आल्यावर अंगठा किंवा चेहरा स्कॅन करून डिजिटल हजेरी नोंदवावी लागेल, ज्यामुळे हजेरीमध्ये पारदर्शकता येईल.
सीसीटीव्ही वॉच: फक्त हजेरी लावून पळून जाणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी वर्गांमध्ये सीसीटीव्ही लावले जातील.
शिक्षकांवर दुहेरी जबाबदारी: शिक्षकांना केवळ हजेरीची नोंद ठेवायची नसून, सीसीटीव्हीच्या माध्यमातून विद्यार्थी वर्गात उपस्थित आहेत की नाही, याची खातरजमा करावी लागेल. तर मुख्याध्यापकांवर या संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवण्याची मुख्य जबाबदारी असेल.



