दुबईतील एमिरेट्स रोडवर काळाचा घाला: ६ भारतीयांसह सात कामगारांचा रस्ते अपघातात मृत्यू

दुबई : दुबई-शारजाह सीमेवरील एमिरेट्स रोडवर सोमवारी सायंकाळी झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात सहा भारतीय कामगारांसह सात जणांचा मृत्यू झाला आहे. कामावरून आपल्या निवासस्थानी परतणाऱ्या कामगारांची मिनी बस अचानक बंद पडलेल्या ट्रकला धडकल्याने हा मोठा अपघात झाला.
प्राथमिक माहितीनुसार, मिनी बसमध्ये चालकासह एकूण १७ कर्मचारी प्रवास करत होते. एमिरेट्स रोडवरून जात असताना, तांत्रिक बिघाडामुळे रस्त्याच्या मध्यभागी अचानक बंद पडलेल्या एका अवजड ट्रकला बसची जोरदार धडक बसली. बसच्या उजव्या बाजूला ही धडक बसल्यामुळे जीवितहानी अधिक झाली. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की, सहा भारतीय कामगार आणि एका श्रीलंकेच्या नागरिकाचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातात नऊ जण जखमी झाले होते. त्यापैकी ५ जणांना प्राथमिक उपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर ३ भारतीयांसह १ नेपाळी नागरिक अशा चार जणांवर अजूनही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी तिघांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
भारतीय दूतावासाची पावले
घटनेची माहिती मिळताच दुबईतील भारतीय वाणिज्य दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ रुग्णालयांना भेट दिली. दूतावासाचे अधिकारी स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधून मृतांची ओळख पटवण्याचे आणि मृतदेह लवकरात लवकर त्यांच्या मायदेशी पाठवण्याचे (Repatriation) काम करत आहेत. मृतांच्या कुटुंबीयांनाही दूतावासाकडून आवश्यक ती सर्व माहिती दिली जात आहे.
दुबई पोलिसांचा इशारा
या दुर्घटनेनंतर दुबई पोलिसांनी वाहनचालकांसाठी कडक नियमावली स्पष्ट केली आहे. तांत्रिक बिघाडामुळे गाडी रस्त्यात बंद पडल्यास वाहनचालकाने तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, वाहनाचे ‘हॅझार्ड लाईट्स’ चालू ठेवावेत आणि स्वतः सुरक्षित ठिकाणी उभे राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे दुबई पोलिसांनी सांगितले आहे.
सध्या या प्रकरणाचा तपास दुबई पोलीस करत असून, बस चालकाची चूक होती की ट्रक चालकाने नियमांचे उल्लंघन केले, याचा शोध घेतला जात आहे.



