संतापजनक: बैलाच्या जागी पत्नीला जुंपले; लातूरमध्ये बळीराजाचा आत्मसन्मान लिलावात!

महाराष्ट्र मिशन विशेष प्रतिनिधी | देवणी (लातूर)
एकीकडे राज्य आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करत असल्याच्या मोठ्या गप्पा मारल्या जात असताना, दुसरीकडे लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यात बळीराजाची अवस्था अत्यंत भीषण असल्याचे समोर आले आहे. बोंबळी खुर्द येथील शेतकरी काशिनाथ गायकवाड यांना निसर्गाच्या कोपाचा आणि सरकारी यंत्रणेच्या अनास्थेचा असा काही फटका बसला की, त्यांना चक्क आपल्या पत्नीला नांगराला जुंपण्याची वेळ आली आहे.
ऐन पेरणीच्या तोंडावर ‘अस्मानी’ संकट
५ जून रोजी झालेल्या जोरदार वादळी पावसाने गायकवाड यांच्या शेतातील दोनपैकी एक बैल वीज पडून मृत्युमुखी पडला. एका क्षणात शेतकऱ्याचा मुख्य आधार हिरावला गेला. आधीच निसर्गाच्या लहरीपणामुळे खचलेला हा शेतकरी, नवीन बैल विकत घेण्याच्या स्थितीत नव्हता. प्रशासनाकडे मदतीची आर्त हाक मारली, परंतु सरकारी दप्तरातील कागदी घोडे नाचवण्यात यंत्रणा मग्न असल्याने गायकवाड यांना कोणतीही ठोस मदत मिळाली नाही.
पत्नीचे अश्रू अन् नांगराचे जू!
मृग नक्षत्राच्या पेरणीचा हंगाम हातातून निसटून जाण्याची भीती आणि वर्षभराच्या अन्नाची चिंता या विवंचनेपोटी काशिनाथ गायकवाड यांनी एक टोकाचे पाऊल उचलले. त्यांनी नांगराला एका बाजूला उरलेला एक बैल आणि दुसऱ्या बाजूला आपली पत्नी औशाबाई काशिनाथ गायकवाड यांना जुंपले. एका महिलेला शेतात राबताना पाहून उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला आणि पाहणाऱ्यांच्या डोळ्यांत पाणी तरळले.
प्रशासनावर संतापाचा ‘लाव्हा‘
“सरकार फक्त कागदावर योजना जाहीर करते, पण प्रत्यक्ष मैदानात शेतकरी उघड्यावर पडला आहे,” असा तीव्र संताप गावकरी आणि शेतकरी संघटनांमधून व्यक्त केला जात आहे. या हृदयद्रावक घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल झाला असून, संपूर्ण लातूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
तात्काळ मदतीची मागणी
या घटनेने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची भीषण वास्तव स्थिती चव्हाट्यावर आणली आहे. प्रशासनाने कोणतीही तांत्रिक कारणे पुढे न करता, काशिनाथ गायकवाड यांना तातडीने आणि भरीव आर्थिक मदत करावी, जेणेकरून ते नवीन बैल जोडी घेऊ शकतील. अन्यथा, या विरोधात तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी वर्गाने दिला आहे.



