तमिळनाडू: कारखान्यात अमोनिया गळतीचा हाहाकार; ७ महिलांचा मृत्यू, ६० कामगार गंभीर
मुख्यमंत्र्यांकडून ३ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश

विशेष प्रतिनिधी/चेन्नई : तमिळनाडूतील तिरुवल्लूर जिल्ह्यात एका सी-फूड कारखान्यात अमोनिया वायूची भीषण गळती होऊन ७ महिला कामगारांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक दुर्घटना रविवारी घडली. या गॅस गळतीमुळे ६० पेक्षा जास्त लोकांची प्रकृती बिघडली असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संपूर्ण तमिळनाडूमध्ये एकच खळबळ उडाली असून मृतांमध्ये उत्तर भारतातील स्थलांतरित महिला कामगारांचा समावेश आहे.
गुदमरला श्वास, ६७ जण रुग्णालयात
मिळालेल्या माहितीनुसार, तिरुवल्लूर जिल्ह्यातील सी-फूड प्रक्रिया करणाऱ्या एका कारखान्यात रविवारी अचानक अमोनिया वायूची गळती सुरू झाली. वायूचा तीव्र दर्प पसरल्याने कारखान्यातील कामगारांना श्वास घेण्यास प्रचंड त्रास होऊ लागला आणि अनेकांना उलट्या व चक्कर येऊ लागली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विषारी वायू श्वासात गेल्याने ७ महिलांचा जागीच किंवा रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू झाला.
जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, गॅस गळतीमुळे बाधित झालेल्या ६७ जणांना तातडीने स्थानिक वैद्यकीय केंद्रांमध्ये दाखल करण्यात आले. त्यापैकी गंभीररीत्या बाधित असलेल्या ९ जणांना पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकेद्वारे चेन्नई येथील मोठ्या रुग्णालयात हलवण्यात आले असून, त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
मुख्यमंत्री विजय यांचे चौकशीचे आदेश
या दुर्दैवी घटनेवर तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मुख्यमंत्र्यांनी घटनेचा गांभीर्याने आढावा घेत तात्काळ जिल्हा प्रशासनाला घटनास्थळी मदतकार्य करण्याचे आदेश दिले. तसेच, ही दुर्घटना नेमकी कशामुळे घडली? याची चौकशी करण्यासाठी त्यांनी एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. या समितीत औद्योगिक सुरक्षा, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
२४ तासांत अहवाल सादर करण्याचे निर्देश
मुख्यमंत्री विजय यांनी या चौकशी समितीला २४ तासांच्या आत प्राथमिक (अंतरिम) अहवाल आणि पुढील तीन दिवसांत अंतिम अहवाल सादर करण्याचे कडक निर्देश दिले आहेत. याशिवाय, तिरुवल्लूर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना तातडीने घटनास्थळी भेट देण्यास सांगण्यात आले असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या समन्वयाने सर्व बाधित कामगारांना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार आणि मदत पुरवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. या संपूर्ण घटनेमुळे औद्योगिक क्षेत्रातील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.



