लिहून दिलेलंही वाचता येईना; राहुल नार्वेकरांच्या ‘त्या’ मराठीवरून महाराष्ट्र पेटला!

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर सध्या सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात तीव्र टीकेचे धनी ठरत आहेत. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना आदरांजली वाहताना विधानसभेत त्यांनी मांडलेल्या शोकप्रस्तावात मराठी शब्दांचे केलेले अत्यंत चुकीचे उच्चार आणि वाचनातील अक्षम्य चुकांमुळे, “राज्याच्या सर्वोच्च सभागृहाच्या प्रमुखाला जर मातृभाषा धड वाचता येत नसेल, तर महाराष्ट्राचे कसे होणार?” असा संतप्त सवाल जनतेकडून आणि विरोधकांकडून विचारला जात आहे.
वडिलांचे नाव बदलले; एकाच भाषणात २६ चुका!
सभागृहात अधिकृत शोकप्रस्ताव वाचताना राहुल नार्वेकर यांनी अनेक शब्दांचा चुकीचा उच्चार केला. आशा भोसले यांचे वडील आणि संगीतातील महर्षी पं. दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाचा उल्लेख नार्वेकरांनी चक्क ‘दीनदयाल’ असा केला. या गंभीर चुकीसोबतच ‘रसिकांच्या’ ऐवजी ‘रेसिकांच्या’, ‘अलौकिक’ ऐवजी ‘अवलोकिक’, आणि ‘शृंगार’ ऐवजी ‘श्रीगार’ असे अनेक मराठी शब्द त्यांनी चुकीच्या पद्धतीने वाचले. सोशल मीडियावरील दाव्यानुसार, त्यांनी अवघ्या काही मिनिटांच्या भाषणात तब्बल २६ वेळा शब्दांचे चुकीचे उच्चार केले.
“कागदावर लिहून दिलेलंही वाचता येत नाही का?” – राज ठाकरेंचा टोला
मराठी भाषेला नुकताच ‘अभिजात भाषेचा’ दर्जा मिळाला असताना, राज्याच्या विधानसभा अध्यक्षांकडून अशी भाषा ऐकल्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शालिनी ठाकरे यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. “कागदावर लिहून दिलेले मराठीही जर राज्याच्या प्रमुखांना वाचता येत नसेल, तर ही महाराष्ट्रासाठी आणि मराठी भाषेसाठी शोकांतिका आहे,” अशी टीका विरोधकांकडून होत आहे.
नेटकऱ्यांकडून जोरदार ट्रोलिंग
सोशल मीडियावर या भाषणाचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला असून, नेटकऱ्यांनी राहुल नार्वेकर यांना चांगलेच धारेवर धरले आहे. “ज्या राज्याची मातृभाषा मराठी आहे, तिथे कायदा करणाऱ्या मुख्य व्यक्तीलाच भाषेचे भान नसावे हे दुर्दैवी आहे,” अशा कमेंट्स नागरिक करत आहेत. यापूर्वीही त्यांच्या एका कथित व्हिडिओवरून वाद झाला होता, मात्र यावेळी मराठी अस्मितेचा मुद्दा असल्याने नेटकऱ्यांनी थेट त्यांच्या पद आणि पात्रतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.



