महाराष्ट्रमुंबई

“वर दोन गुजराती बसलेत म्हणून वाट्टेल ते कराल का?”; पांढऱ्या पट्टीच्या वादावरून राज ठाकरेंचा जैन शिष्टमंडळाला थेट इशारा

मुंबई : “राजकीय पक्षांच्या नादी लागून आमच्यावर येऊ नका. तुमचा वापर केला जात आहे आणि तुमची डोकी भडकवली जात आहेत. तुमची डोकी कमी भडकतील, पण आमची डोकी भडकली तर केवढी भडकतील?” असा थेट आणि आक्रमक सवाल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जैन समाजाच्या शिष्टमंडळाला स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे. रहिवासी सोसायट्यांमध्ये जैन मुनींच्या आगमनानिमित्त रस्त्यांवर मारल्या जाणाऱ्या पांढऱ्या पट्ट्यांवरून सध्या सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर जैन समाजाच्या शिष्टमंडळाने राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. त्यावेळी राज ठाकरेंनी आपली रोखठोक भूमिका मांडली.

तुम्ही ट्रॅफिक डिपार्टमेंट आहात का? राज ठाकरेंचा खोचक टोला

सोसायट्यांच्या परिसरातील रस्त्यांवर मारल्या जाणाऱ्या पांढऱ्या पट्ट्यांवर आक्षेप घेत राज ठाकरे म्हणाले, “तुमच्या सोसायटीमध्ये तुमचे कोणी मुनी येणार असतील, तर तिथे कार्पेट टाका आणि ते मुनी येऊन गेले की ते कार्पेट काढून टाका. तुम्ही सरसकट रस्त्यांवर पांढरे पट्टे मारता, यातून तुम्हाला नेमके काय सांगायचे आहे? सगळीकडे पांढरे पट्टे मारायला तुम्ही काय ट्रॅफिक डिपार्टमेंट आहात का?” असा खोचक टोला त्यांनी लगावला. रहिवासी भागात अशा गोष्टींमुळे विनाकारण वाद निर्माण होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गेल्या १०-१२ वर्षांतच हे सगळे का सुरू झाले?

मुंबई आणि महाराष्ट्रातील सामाजिक सलोख्याचा दाखला देत राज ठाकरे म्हणाले, “आम्ही इतकी वर्षे इथे राहत आहोत. गुजराती समाजही इथे अनेक वर्षांपासून राहतोय. आमच्यात कधीही भांडणे झाली नाहीत की कधी वाद झाले नाहीत. मग गेल्या १० ते १२ वर्षांतच हे सगळे का सुरू झाले आहे?” केंद्र सरकारचा अप्रत्यक्ष संदर्भ देत ते पुढे म्हणाले, “या सगळ्या समाजाला काय वाटले की, वर दोन गुजराती बसले आहेत, तर आम्ही काही वाट्टेल ते करू? असे अजिबात चालणार नाही. कुठल्याही सोसायटीने अशा गोष्टी करता कामा नयेत, हे तुम्ही समजून घेतले पाहिजे.”

व्यापारी आहात, व्यापार करा आणि शांत जगा!

जैन समाजाला समजावून सांगताना मनसे प्रमुखांनी शेवटी सांगितले की, “धर्म आपापल्या जागी आहे. धर्माच्या ठिकाणी तुम्ही धर्म करत आहात आणि तुम्हाला धर्माची कामे करायला कोणीही नाही म्हणत नाहीये. आजपर्यंत तुम्हाला कोणी अडवले आहे का? स्वतः जैन मुनी माझ्याही घरी येऊन गेलेले आहेत. पण विनाकारण सामाजिक शांतता बिघडवू नका. तुम्ही व्यापारी लोक आहात; व्यापार करा, शांत राहा आणि शांत जगा! मी जे काही तुम्हाला सांगतोय, ते तुम्ही तुमच्या समाजातील इतर लोकांनाही समजावून सांगा,” असे आवाहन राज ठाकरेंनी या शिष्टमंडळाला केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page