गुन्हेगारीमहाराष्ट्रसातारा

शिंदेवाडी जिल्हा परिषद शाळेजवळच भरतो जुगार अड्डा; नागरिकांनी माहिती देऊनही सातारा पोलीस गाफील

सातारा : जिल्ह्यात शिरवळ येथील शिंदेवाडी मध्ये भर शाळेजवळच जुगाराचा अड्डा चालत असून पोलीस ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष करत आहेत. जागरूक नागरिकांनी या अवैध धंद्याची माहिती कळवूनही जुगार अड्डा राजरोसपणे सुरू असून पोलिसांच्या भ्रष्ट कारभारामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

मागील काही महिन्यांपासून शिरवळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येणाऱ्या शिंदेवाडी येथे भोर रोडलगत असलेल्या गीतांजली हॉटेलच्या पाठीमागे मोठया पत्राच्या शेडमध्ये भला मोठ्ठा पत्त्याचा जुगार अड्डा सुरू असून या ठिकाणी जुगार खेळण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जमा होत आहे. जिल्हा परिषद शाळेपासून काही अंतरावर संबंधित जुगार अड्डा असून भर वर्दळीच्या रस्त्यावर आहे. विद्यार्थी व त्यांचे पालक ये जा करत असतात. अशा ठिकाणी असलेल्या जुगार अड्ड्याची तक्रार पोलिसांकडे केली असता पोलीस बघ्याची भूमिका घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

हा जुगार अड्डा लोकवस्ती जवळच असून या जुगार अड्ड्यापासुन हाकेच्या अंतरावर शिंदेवाडीतील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. सदर जुगार अड्डा हा दिवस-रात्र सुरू असून या ठिकाणी जुगार खेळण्यासाठी मोठ्या प्रमाणात पुण्यासह इतर शहरांमधून अनेक गुंड प्रवृत्तीच्या इसमांची आलिशान चार चाकी वाहनांसह गर्दी होत आहे.

जुगार खेळण्यासाठी आलेल्या लोकांना दारुसह इतर मादक पदार्थ पुरवले जात आहेत. त्यामुळे या परिसरामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. तरीसुद्धा स्थानिक शिरवळ पोलिसांकडून अद्याप या जुगार अड्ड्यावर कुठल्याही प्रकारची दंडात्मक कारवाई झालेली नाही. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात जुगाराचे अड्डे बंद करण्याचे आदेश मध्यंतरी दिले असून सुद्धा शिंदेवाडीत राजरोसपणे जुगार अड्डा चालवला जात आहे. पोलीस अधिकाऱ्यांना दरमहा लाखो रुपयांचा हप्ता दिला जात असल्याने जुगार अड्ड्यावर कारवाई करण्यास पोलीस टाळाटाळ करत असल्याची चर्चा गावात आहे.

‘महाराष्ट्र मिशन’ने संबंधित ठिकाणी स्टींग आॅपरेशन करून सत्यतेची पडताळणी केली. या अड्ड्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा अंतर्गत दंडात्मक कारवाई करून सदर जुगार अड्डा हा तात्काळ बंद करावा असे ट्विट ‘महाराष्ट्र मिशन’चे मुख्य संपादक नरसिंग कांबळे यांनी केले आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page