ना खाऊँगा, ना खाने दूँगा’चा नारा फोल; जयराम रमेश यांची टीका

नवी दिल्ली : जयराम रमेश यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप करताना म्हटले की, पंतप्रधान मोदींचा ‘ना खाऊँगा, ना खाने दूँगा’ हा नारा पूर्णपणे फोल ठरला आहे. त्यांनी आरोप केला की, नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशाचे मोठे नुकसान झाले असून, जीएसपीसी आणि ओएनजीसीचे विलीनीकरण करून २० हजार कोटींचा घोटाळा लपवला गेला. इलेक्टोरल बाँडच्या माध्यमातून ४ लाख कोटींचा ‘चंदा दो, धंदा लो’ असा प्रकार चालला असून, अदानी समूहाचा अवास्तव विस्तार हेच मोदी सरकारच्या कारभाराचे सत्य असल्याचे त्यांनी म्हटले.
यासोबतच, राफेल खरेदी व्यवहार आणि पीएम केअर्स फंडातील अपारदर्शकतेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सरकारी संस्थांचे खच्चीकरण करण्यात येत असल्याचा दावा करत, आयुष्मान भारत आणि कौशल्य विकास योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा अहवाल त्यांनी निदर्शनास आणून दिला. अयोध्येतील राम मंदिर देणगीतील चोरीला त्यांनी ‘श्रद्धेचा विश्वासघात’ म्हटले असून, सर्वोच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश देऊनही अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पदावर कायम असल्याचा आरोप करत सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.



