मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ: सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाला पक्षातूनच आव्हान

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या निवडीवर पक्षातीलच वरिष्ठ नेत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पक्षाचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी वकिलांमार्फत नोटीस पाठवून या निवडीला कायदेशीर आव्हान दिले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

२८ जानेवारी २०२६ रोजी अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यानंतर कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी राष्ट्रवादीच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घोषणा केली होती. आता या निवडीला आक्षेप घेत सच्चिदानंद सिंह यांनी ९ जुलै रोजी पक्षाचे अध्यक्ष आणि वरिष्ठ नेत्यांना नोटीस बजावली आहे.

सच्चिदानंद सिंह यांचे मुख्य आक्षेप

१. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेली राष्ट्रीय अध्यक्षांची निवडणूक अवैध असून ती रद्द करून पुन्हा निवडणूक घ्यावी.

२. नवीन निवडणूक होईपर्यंत राष्ट्रीय अध्यक्ष आणि नवीन पदाधिकाऱ्यांची यादी रद्द समजली जावी.

३. १७ फेब्रुवारी २०२६ रोजी निवडणूक आयोगाला दिलेल्या सुधारित संविधानानुसार प्रफुल पटेल यांच्याकडे अधिकार होते. मग २६ फेब्रुवारीची बैठक ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी कोणत्या अधिकारात बोलावली?

४. कार्यकारिणीची बैठक बोलावण्यासाठी तत्कालीन सदस्यांची कोणतीही पूर्वपरवानगी घेण्यात आली नव्हती.

सच्चिदानंद सिंह यांच्या आरोपांचे राष्ट्रवादीने खंडन केले आहे. पक्षाचे सरचिटणीस सूरज चव्हाण यांनी म्हटले की, “सुनेत्रा पवार यांची निवड कायदेशीर मार्गानेच झाली आहे. सिंह यांनी केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी हे कृत्य केले आहे. पक्षाच्या घटनेनुसार ही प्रक्रिया पार पडली असून, लवकरच आम्ही याबाबत सविस्तर खुलासा करू.”

सच्चिदानंद सिंह हे झारखंडचे प्रदेशाध्यक्ष असून ते १५ वर्षांपासून पक्षाशी जोडलेले आहेत. त्यांनी उपस्थित केलेल्या या कायदेशीर प्रश्नांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद उफाळून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page