मुंबई

चेंबूर बस दुर्घटना: कंत्राटदार आणि सल्लागार संस्थेला दंडाची शिक्षा, अधिकाऱ्यांना ‘क्लीन चिट’

मुंबई: चेंबूर येथील डायमंड गार्डन परिसरात ३० जून रोजी शाळेच्या बसवर पिंपळाचे झाड पडून झालेल्या दुर्घटनेचा चौकशी अहवाल महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. या प्रकरणी झाडांच्या सुरक्षेसाठी नेमलेल्या कंत्राटदाराला ५ लाख रुपये, तर कामावर देखरेख ठेवणाऱ्या सल्लागार संस्थेला (मे. माहिमतुरा कन्सलटंट) २ लाख रुपयांचा दंड करण्याची शिफारस समितीने केली आहे. मात्र, या दुर्घटनेत रस्ते आणि उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई न करता त्यांना ‘क्लीन चिट’ देण्यात आली आहे.

दुर्घटनेपूर्वी उद्यान विभागाने संबंधित परिसराची पाहणी केली होती आणि मान्सूनपूर्व झाडांची छाटणीही झाली होती. तसेच, उद्यान विभागाने रस्ते विभागाला झाडांच्या सुरक्षिततेबाबत वारंवार सूचना दिल्या होत्या. त्यामुळे या प्रकरणात रस्ते किंवा उद्यान विभागाचा दोष नसल्याचे समितीने स्पष्ट केले आहे.

रस्ते खोदकामाचे काम करताना कंत्राटदाराने झाडांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती खबरदारी घेतली नसल्याचे समितीच्या तपासात निष्पन्न झाले आहे. काम करताना कंत्राटदारावर योग्य देखरेख ठेवणे आणि झाडांचे स्थैर्य अबाधित राखणे ही सल्लागार संस्थेची जबाबदारी होती. मात्र, त्यांनी पुरेशी खबरदारी न घेतल्यामुळे त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई सुचवण्यात आली आहे.

भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी महापालिकेने झाडांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. यात पावसाळ्यापूर्वी झाडांचे ‘ट्री रिस्क असेसमेंट’ करणे, सर्व झाडांची जीआयएस (GIS) आधारित नोंदणी करणे, झाडांच्या मुळांचे वैज्ञानिक संरक्षण करणे, अति-काँक्रीटीकरण टाळणे आणि सहामाही सुरक्षा लेखापरीक्षण (ऑडिट) करणे यांसारख्या उपाययोजनांचा समावेश असेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page