बोपदेव घाटातील प्रकरणानंतर पुण्यातील सर्व टेकड्यांवर बसविणार ‘सर्च लाईट’

पुणे : पुणे शहर संस्कृतीचे शहर होते. यामुळे ‘पुणे तिथे काय उणे’ ही म्हण प्रचलित झाली. परंतु गेल्या काही वर्षांपासून पुणे शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणावर झाला. गेल्या पाच ते सात दिवसांत पुण्यात अत्याचाराच्या चार मोठया घटना उघड झाल्या आहेत. पुणे शहरातील गुन्हेगारी वाढली आहे. यामुळे पुणे शहर पोलिसांनी आता शहरातील टेकड्यांवर आणि घाटांमध्ये सर्च लाईट बसवण्याचा निर्णय घेतला आहे. या टेकड्यांवर सायरनसुद्धा असणार आहेत.
दरम्यान, पुणे शहर माहिती अन् तंत्रज्ञानाची नगरी झाली अन् देशभरातून सॉफ्टवेअर अभियंते पुण्यात आले. परंतु मागील काही गुन्हेगारीच्या घटना पाहून हळूहळू पुणे शहराची संस्कृती हरवत चालली आहे की काय? असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. पुण्यातील सर्व टेकड्यांवर ‘सर्च लाईट’ बसवण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे.
३ ऑक्टोबर रोजी बापदेव घाटात एका २१ वर्षीय युवतीवर तिघांनी सामूहिक अत्याचार केला होता. त्या प्रकरणामुळे पुणे हादरले आहे. या प्रकरणातील तिन्ही आरोपींना अजून पकडण्यात पुणे पोलिसांना यश आले नाही. या प्रकरणानंतर पुणे पोलिसांनी घाट आणि टेकड्यांवर सर्च लाईट बसवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. तसेच शहरातील सर्व टेकड्यांवर सायरन सुद्धा बसवले जाणार आहेत. आपत्कालीन परिस्थितीत हा सायरन महत्त्वाचा ठरणार आहे.
आरोपींची माहिती देणाऱ्यास १० लाखांच्या बक्षिसाची घोषणा
बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना हुडकून काढण्यासाठी राज्य सरकार आणि गृह मंत्रालयाने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
या प्रकरणातील आरोपींची माहिती देणाऱ्या व्यक्तीला १० लाख रुपयांचे इनाम देण्याची घोषणा पोलीस खात्याकडून करण्यात आली आहे. आरोपींची नावे आणि ठावठिकाणा सांगणाऱ्या व्यक्तीची ओळखही गुप्त ठेवली जाईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.



