सातारा

बिबट्याच्या हल्ल्याने सातारा हादरला; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा बळी

विशेष प्रतिनिधी | महाराष्ट्र मिशन

सातारा : सातारा तालुक्यातील न्हाळेवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात जय संदीप खंडागळे या दोन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याने परिसर हादरला आहे. शनिवारी रात्री वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर अंधाराचा फायदा घेत बिबट्याने घराबाहेर आलेल्या जयवर झडप घातली आणि त्याला शेताच्या दिशेने नेले. ग्रामस्थांनी पाठलाग करून त्याला बिबट्याच्या तावडीतून सोडवले; मात्र गंभीर जखमी झालेल्या जयला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

या घटनेनंतर न्हाळेवाडी, मालगाव आणि शिवथर परिसरातील ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. परिसरात बिबट्याचा वावर असल्याच्या तक्रारी यापूर्वी करण्यात आल्याचा ग्रामस्थांचा दावा आहे. त्यामुळे वनविभागाने वेळेत उपाययोजना का केल्या नाहीत, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

बिबट्याच्या बंदोबस्ताची मागणी

जयच्या मृत्यूनंतर ग्रामस्थांनी थेट वनविभागाकडे बिबट्याला पकडण्याची आणि परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीच्या उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. वनविभागाने घटनास्थळी पाहणी करून १० कॅमेरा ट्रॅप आणि पिंजरे लावल्याची माहिती दिली आहे. तसेच बिबट्याला जेरबंद करण्यासाठी युद्ध पातळीवर शोधमोहीम सुरू आहे.

‘मदत नको, कायमचा बंदोबस्त करा’

जयच्या मृत्यूनंतर संतप्त ग्रामस्थांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्या निवासस्थानी धाव घेत बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी केली. मृत बालकाच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची मदत देण्यात आली असून, उर्वरित १५ लाख रुपयांची शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले.

जय संदीप खंडागळेच्या मृत्यूने सातारा तालुक्यात मानवी वस्त्यांजवळ वाढत चाललेला बिबट्यांचा वावर आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आता वनविभागाच्या शोधमोहीमेत बिबट्या जेरबंद होतो का आणि परिसरातील नागरिकांना प्रत्यक्ष सुरक्षा मिळते का, याकडे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page