सातारा

प्रत्येक बेघराला मिळणार हक्काचे घर’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सातारा येथून ग्वाही

सातारा : “प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘सर्वांसाठी पक्की घरे’ या स्वप्नपूर्तीसाठी महाराष्ट्र शासन अहोरात्र काम करत आहे. येत्या पाच वर्षांत महाराष्ट्रातील प्रत्येक बेघराला पक्के घर दिले जाईल,” अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली. सातारा येथील सैनिक स्कूलच्या मैदानावर आयोजित प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत ५ लाख घरांचा लोकार्पण सोहळा आणि ‘महाआवास अभियान’ राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी ३० लाख घरे मंजूर केली आहेत. एका वर्षात एवढे मोठे उद्दिष्ट मिळवणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले असून, हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. या कामासाठी आज ९ हजार कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, अत्यंत गतीने काम करत आज ५ लाख लाभार्थ्यांना त्यांच्या घरांच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या आहेत. पुढील वर्षापर्यंत आणखी १५ लाख लोकांना हक्काची घरे दिली जातील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या ऐतिहासिक सोहळ्याला केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, खासदार उदयनराजे भोसले, आणि अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांसह अनेक वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषदा आणि विभागांना ‘महाआवास अभियान’ अंतर्गत राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयातून ग्रामीण भागाचा कायापालट करण्याचा संकल्प यावेळी सोडण्यात आला.

कार्यक्रमाला पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, केंद्रीय सह सचिव अमित शुक्ला आणि ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांसह प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सातारा येथील या सोहळ्याने राज्यातील गृहनिर्माण क्षेत्रातील एका नव्या पर्वाची सुरुवात झाल्याचे मानले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page