महाराष्ट्रमुंबई

एसटीच्या ‘एनसीएमसी’ स्मार्ट कार्डला राज्यभरातून तुफान प्रतिसाद; १ कोटीहून अधिक प्रवाशांची नोंदणी, ६४ लाखांहून अधिक कार्डे सक्रिय!

येत्या १ सप्टेंबरपासून महिला व ज्येष्ठांसाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य; १५ ऑगस्टपासून शालेय विद्यार्थ्यांच्या नोंदणी प्रक्रियेला सुरुवात

मुंबई विशेष वृत्त : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवाशांना अधिक सुलभ, सुरक्षित आणि डिजिटल प्रवासाचा अनुभव मिळावा, यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘एनसीएमसी’ (NCMC) स्मार्ट कार्डला राज्यभरातून अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, १२ ऑगस्टपर्यंत राज्यात तब्बल १ कोटी १ लाख ७३ हजार ८३८ प्रवाशांनी ‘एनसीएमसी’ स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली असून, त्यापैकी ६४ लाख ९१ हजार ६५ कार्डे यशस्वीरित्या सक्रिय झाली आहेत.

डिजिटल व कॅशलेस प्रवासाच्या दिशेने मोठे पाऊल

‘एनसीएमसी’ स्मार्ट कार्डच्या माध्यमातून एसटी प्रवासातील तिकीट व्यवहार अधिक पारदर्शक, सुलभ आणि कॅशलेस करण्याच्या दिशेने महामंडळाने अत्यंत महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. सध्या पहिल्या टप्प्यात महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना या स्मार्ट कार्डचे वाटप केले जात आहे. विशेष म्हणजे, येत्या १ सप्टेंबरपासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘एनसीएमसी’ स्मार्ट कार्ड सक्तीचे (अनिवार्य) करण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या पात्र लाभार्थ्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही, त्यांनी लवकरात लवकर आपले स्मार्ट कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन एसटी महामंडळाकडून स्पष्टपणे करण्यात आले आहे.

वाहतूक मंत्र्यांची प्रतिक्रिया

याविषयी बोलताना परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक म्हणाले की, “एसटी ही केवळ प्रवासाची सेवा नसून महाराष्ट्राच्या जनजीवनाशी घट्ट जोडलेली हक्काची लोकवाहिनी आहे. या लाडक्या ‘लालपरी’चा प्रवास काळानुरूप अधिक आधुनिक, डिजिटल आणि प्रवाशांसाठी सुखकर करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न आहे. ‘एनसीएमसी’ स्मार्ट कार्डला मिळत असलेला हा प्रचंड प्रतिसाद प्रवाशांचा या डिजिटल परिवर्तनावरील दृढ विश्वास दर्शवतो.” भविष्यात एसटीच्या सेवांमध्ये तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून प्रवाशांचा मौल्यवान वेळ वाचवणे आणि प्रवास अधिक सोयीस्कर करणे हेच आपले मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले.

शालेय विद्यार्थ्यांसाठी १५ ऑगस्टपासून विशेष मोहीम

आगामी १५ ऑगस्टपासून राज्यभरातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट कार्डच्या नोंदणीची विशेष प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. यासाठी एसटीचे अधिकृत परवानाधारक प्रतिनिधी थेट प्रत्येक शाळेत जाऊन ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून घेणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी इतर कोणत्याही अनाधिकृत ठिकाणी नोंदणीसाठी धाव घेऊ नये, असे आवाहन महामंडळाने केले आहे. प्रवाशांना हे स्मार्ट कार्ड अधिकृत एसटी आगार, बसस्थानके तसेच अधिकृत एजंट नेटवर्कच्या माध्यमातून सहज मिळविता येणार असून, कार्ड रिचार्ज करण्याची सोयही याच माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे.

‘प्रवासी प्रथम’ हेच धोरण

प्रवाशांचा हा विश्वास हीच एसटीची खरी ताकद असल्याचे सांगत मंत्री प्रताप सरनाईक यांनी, आधुनिकतेच्या या प्रवासात प्रवाशांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. येत्या काळात ‘एनसीएमसी’ स्मार्ट कार्डचा वापर आणखी व्यापक करून ‘प्रवासी प्रथम’ या सर्वसमावेशक भूमिकेतून एसटीच्या प्रवासी सेवांना एक नवे आणि आधुनिक डिजिटल रूप दिले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page