राज्यातील १२ किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा

नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराजांच्या तब्बल १२ किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा प्राप्त झाला आहे. महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूतील १ जिंजी या १२ किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक हेरिटेज दर्जा मिळाला. यावर आज पॅरिसमध्ये मतदान पार पडले. त्यात निर्णायक बहुमत मिळवत शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान मिळाले.
दीड वर्षापूर्वी या किल्ल्यांचे वर्ल्ड हेरिटेज साइटसाठी नॉमिनेशन झाले होते. फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे वारसास्थळांत किल्ल्यांचा समावेश व्हावा, यासाठी आज मतदान पार पडले. त्यावेळी अनेक देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले आणि महाराजांच्या किल्ल्यांना बहुमान प्राप्त झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी रचलेल्या दुर्गराज्याचा ऐतिहासिक ठसा आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाला. महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूतील १ अशा एकूण १२ किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये मानांकन मिळाले. हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे.
या मानांकनासाठी सांस्कृतिक कार्य विभागाच्या अंतर्गत असलेल्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय यांच्यातर्फे प्रस्ताव तयार करण्यात आला होता. यात स्वराज्याची राजधानी रायगड, पहिली राजधानी राजगड, प्रतापगड, शिवनेरी, स्वराज्याच्या नौदलाचे प्रमुख केंद्र सिंधुदुर्ग, लोहगड, साल्हेर, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, खांदेरी (महाराष्ट्र) आणि जिंजी (तामिळनाडू) या किल्ल्यांचा समावेश आहे.
महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकारचे योगदान
या यशामागे केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनाचे एकत्रित प्रयत्न महत्त्वपूर्ण ठरले. पंतप्रधान मोदी यांच्या पाठिंब्याने आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (ASI) तसेच संस्कृती मंत्रालयाच्या सहभागाने हा टप्पा गाठता आला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या यशासाठी पंतप्रधान मोदी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, अपर मुख्य सचिव विकास खारगे, भारताचे युनेस्कोतील राजदूत विशाल शर्मा आणि पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे हेमंत दळवी यांचे आभार मानले आहेत. शेलार यांनी युनेस्कोच्या महानिदेशकांची भेट घेऊन तांत्रिक सादरीकरण केले, ज्यामुळे या यशाला गती मिळाली.



