कृषीछ. संभाजीनगरपुणे शहरमराठवाडामहाराष्ट्रमुंबईराजकारणसामाजिक

हंबरडा मोर्चातून उद्धव ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका

५० खोके घेणा-यांकडे ५० हजार हेक्टरी मागतो

छ. संभाजीनगर : मराठवाड्यात अतिवृष्टी आणि महापुराने मोठे नुकसान झाले. पण सरकारची भरपाईची रक्कम तुटपुंजी असल्याची ओरड सुरू आहे. त्याविरोधात रविवारी छत्रपती संभाजीनगर येथे शिवसेनेने हंबरडा मोर्चा काढला. गुलमंडी येथे उद्धव ठाकरे यांनी सभेला संबोधित करताना महायुती सरकारवर आसूड ओढला. त्यांच्या शाब्दिक चाबकाच्या फटका-यांनी सभेत जान आणली. त्यांनी सरकारला शेतक-यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी केली.

१५ दिवसांपूर्वी मी मराठवाड्यात आलो होतो. पाच एक जिल्ह्यांत शेतक-यांना भेटलो होतो. तेव्हाच जाहीर केलं होतं की जोपर्यंत हे सरकार कर्जमुक्ती करत नाही, तोपर्यंत सरकारला सोडत नाही. गेल्यावेळी पाऊस होता. आता कडक ऊन आहे. आम्ही शहरी बाबू. लोकं विचारतात हे काय जाणार तिकडे. दोन गोष्टी केल्या. परंपरेप्रमाणे दसरा मेळावा घेतला. पाऊस पडत असताना चिखलात घेतला. आज तर कडक ऊन आहे. मेळाव्याच्या वेळी विचारले लोक चिखलात कसे बसणार. शेतकरी ऊन वारा पावसात अन्नधान्य पिकवतो. त्याचे आयुष्य चिखलात असते. आपण साधी सभा घेऊ शकत नाही, असे ते म्हणाले.

बोलणा-यांना बोलू द्या. तुमच्या प्रत्येक संकटावेळी शिवसेना तुमच्यासोबत राहील. संकटाशी लढल्याशिवाय राहणार नाही. ५० हजार पर हेक्टर मागितले. हे काही मला स्वप्न पडलं नाही. शेतक-यांना विचारून सांगितलं. मी म्हटलं तुमची कितीची अपेक्षा आहे. म्हणजे गाडा चालला पाहिजे. शेतकरी म्हणाले, ५० हजार पाहिजे. कर्जमुक्ती पाहिजे, अशी उद्धव ठाकरे यांनी मागणी केली.

मदतीची घोषणा ही सर्वांत मोठी थाप

३१ हजार कोटींचे पॅकेज. इतिहासातील सर्वांत मोठं पॅकेज म्हणतात. हे सर्वांत मोठं पॅकेज नाही. इतिहासातील सर्वांत मोठी थाप आहे. आजपर्यंत कोणी ही थाप मारली नव्हती. इतिहासातील पहिली मोठी थाप फडणवीस सरकारने केली असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला. कळवळा असता तर मोदी महाराष्ट्रात येऊन गेले. त्यांच्या भाषणानंतर दोन-तीन भाषणे झाली. त्यात शेतक-यांबद्दल उल्लेख नव्हता. ज्या पंतप्रधानांना महाराष्ट्रातील शेतक-यांची परिस्थिती माहीत नाही. त्यांच्याकडे काय न्याय मागायचा.. सत्तेत एक फूल आणि दोन हाफ बसले आहेत, असा टोला उद्धव ठाकरे यांनी या वेळी हाणला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page