लेख

लेख: मत व्यक्त करण्याची ‘भूल’ महागात पाडण्यासाठीचा डॉ. संग्राम पाटलांविरुध्दचा कट फसला

लंडनमध्ये राहून कोरोना काळात व्हिडिओच्या माध्यमातून ऑनलाईन जागरूकता निर्माण करणारे डॉ. संग्राम पाटील यांना एखाद्या क्रूर गुन्हेगाराप्रमाणे ताब्यात घेण्याची कारवाई अत्यंत घाईगडबडीची, अतिरेकी आणि कायद्याच्या मूलभूत तत्त्वांना छेद देणारी आहे. डॉ. संग्राम पाटील हे डॉक्टर असून त्यांचे शिक्षण पुण्यातील बीजे वैद्यकीय महाविद्यालयात झाले असून ते भूलशास्त्र विषयात एमडी आहेत. त्यानंतर ते इंग्लंडमधील विविध वैद्यकीय संस्थांशी संबंधित असल्याचे नमूद करण्यात आले आहे. ते पेन मेडिसिन आणि ऍनेस्थेटिक्स कन्सल्टंट म्हणून काम करतात. या भूलशास्त्र विषयातील तज्ज्ञाला राजकीय मत व्यक्त करण्याची ‘भूल’ महागात पाडण्यासाठी अंधभक्तांनी पध्दतशीर तयारी केली होती, मात्र डॉ. पाटील त्यांना पुरून उरले.

डॉ. संग्राम पाटील यांना पहाटे २ पासून अटकाव करून ठेवल्यावर १५ तासांनंतर, संध्याकाळी सोडण्यात आले. ते एरंडोल या जळगाव जिल्ह्यातील त्यांच्या गावाकडे रवाना झाले. मोदी सरकारच्या धोरणांविरोधात सातत्याने टीकात्मक लिखाण करत असल्याने पाटील यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. डॉ. संग्राम पाटील हे लंडनमध्ये राहतात. सातत्याने सत्य, निर्भीड आणि स्पष्ट भूमिका मांडण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. एक उत्तम भारतीय जे आता लंडनवासी आहेत त्यांच्यामध्ये डॉ संग्राम पाटील यांचे नाव अग्रणी आहे. लंडन मधील ते अनिवासी भारतीय आहेत.

दरम्यान, चौकशीनंतर किंवा नोटीस बजावण्यात आल्यानंतर माझ्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही, लोकशाहीसाठी आणि संविधानासाठी मी नेहमीच बोलत राहील अशी प्रतिक्रिया डॉ. संग्राम पाटील यांनी व्यक्त केली. त्याबद्दल त्यांचे कौतुक केले पाहिजे. डॉ. संग्राम पाटील यांच्याविरोधात ठाण्यातील रहिवासी निखिल भामरे यांनी तक्रार नोंदवली आहे. ते भारतीय जनता पार्टीसाठी महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया संयोजक या पदावर काम करतात.

डॉ. पाटील यांनी आपल्या पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांची प्रतिमा मलिन करण्याचा तसेच समाजात द्वेषाची भावना निर्माण करणारा मजकूर प्रसिद्ध केला असं त्यांनी पोलीस तक्रारीत म्हटले आहे.

डॉ. संग्राम पाटील यांना मुंबई पोलिसांनी विमानतळावरून ताब्यात घेतले. पहाटे लंडनहून मुंबईत आल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. डॉ. पाटील केवळ ब्रिटनचे नागरिकत्व असल्याने पोलीस त्यांना अटक करू शकले नाहीत. पोलीस त्यांच्याकडून चांगल्या वागणुकीचा बॉण्ड लिहून घेऊन त्यांना अटी आणि शर्ती घालून सोडले जाईल अशी शक्यता होती. सत्तेचे सत्य मांडणाऱ्या एका व्यक्तीला आपल्या पोलिसांनी जो त्रास दिला कुटुंबालाही तणावग्रस्त अवस्थेत आणून छळ केला त्याचा निषेध केला पाहिजे.

भारतातून जाताना पोलिसांना भेटून जावे असे बंधन त्यांच्यावर घालण्यात आलेले आहे. त्यांच्यावरील या कारवाईचा मानवाधिकार कार्यकर्ते वकील असीम सरोदे यांनी निषेध केला. असीम सरोदे त्यांच्या संपर्कात होते आणि संग्राम पाटील यांना कोणतीही कायदेशीर मदत लागल्यास तशी पावले उचलण्यात येतील पण पोलिसांनी अन्यायकारक कारवाई करू नये, कोणत्याही राजकीय व्यक्तीसाठी पोलिसांनी स्वतःचा गैरवापर करू देऊ नये असे असीम सरोदे यांचे म्हणणे होते.

पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्यांना ताब्यात घेतले. साधारण दुपारी ३ पर्यंत ते पोलिसांच्या ताब्यात होते. संग्राम पाटील यांना चौकशी करून सोडण्यात आले. याबाबत पत्रकारांशी बोलताना संग्राम पाटील म्हणाले की, मी फेसबुकवरून सरकारविरोधात लिखाण करत असतो, त्यातील काही पोस्ट सरकारच्या लोकांना आवडल्या नाहीत. त्यांनी पोलिसांकडे तक्रार करून एफआयआर केली होती. त्यामुळे आज मला पोलिसांनी ताब्यात घेतले. दिवसभर चौकशी करून संध्याकाळी मला नोटीस दिली असे त्यांनी सांगितले. हे प्रकरण मतभिन्नतेला गुन्हा ठरवण्याचा धोकादायक पायंडा पाडणारे आहे. आज एका डॉक्टरविरुद्ध ही कारवाई झाली, उद्या कोणत्याही सामान्य नागरिकावर अशीच कारवाई होऊ शकते.

सदर घटना हा फक्त फेसबुक वरील पोस्टवर आधारित असून, या प्रकरणात , कोणताही प्रत्यक्ष हिंसाचार झालेला नाही, कोणताही शासकीय अधिकारी जखमी झालेला नाही, कोणतीही सार्वजनिक मालमत्तेची हानी झालेली नाही. ऑनलाइन पोस्ट व मतप्रदर्शनासाठी अटक करणे कायद्याने योग्य आहे का? जर सोशल मीडियावरील मजकुरासाठी अटक होत असेल, तर लोकशाहीतील अभिव्यक्ती स्वातंत्र्य शिल्लक राहते का?

कुठल्या तरी एका राजकीय पक्षाची पोस्ट आहे. त्याच्यासोबत मला क्लब करून टाकले आहे. त्यामुळे हे प्रकरण गुंतागुतीचे आहे. मला त्यावर लगेच भाष्य करता येणार नाही. हा चौकशीचा भाग आहे. चौकशीतून निष्कर्ष काढला जाईल. मी सध्या थकलोय. साधारण ३५-४० तास प्रवास करून मी मुंबईत आलो. पहाटे २ पासून मला ताब्यात घेत चौकशी करत होते. मी माझी कायदेशीर बाजू तपासेन. तज्ज्ञांकडून सल्ला घेऊन मी माझा लढा लढेन. संग्राम पाटील म्हणाले की, मला या प्रक्रियेमुळे कुठेही जाता येणार नाही असे नाही. मला जिथे जायचं आहे तिथे मी जाऊ शकतो. एका सोशल मीडिया पोस्ट कोणाला आवडली नसल्यामुळे ही तक्रार आहे. त्यात फारसे काही नाही. त्यामुळे दहा दिवसांनंतर मी पुन्हा लंडनला जाणार आहे, असेही डॉ. संग्राम पाटील यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page