बारामतीत विमान कोसळल्यानंतर ४ ते ५ स्फोट, भीषण आगीत होरपळून अजित पवारांसह ५ जण मृत्युमुखी ; दोन महिलांचा समावेश

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा परिषद निवडणुकांसाठी तयारी सुरू केली होती. त्या संदर्भातील बैठकीसाठी येत असतानाच अकल्पित दुर्घटनेत या उमद्या नेतृत्वाला काळाने हिरावून घेतले. विमान कोसळून ४ ते ५ मोठे स्फोट झाले. मोठी आग लागली. त्यामुळे बचावासाठी सुध्दा कोणी धावू शकले नाही.
अजित पवारांसह विदीप जाधव, पिंकी माळी तसेच विमान चालक कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक हे दुर्घटनेत मरण पावले.
अजित पवारांच्या विमानाला अपघात होऊन ते दगावल्याची बातमी बुधवारी सकाळी संपूर्ण महाराष्ट्राला हादरा देणारी ठरत आहे. आज सकाळी मुंबईहून विशेष विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते. बारामतीत जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचार सभांचे आयोजन करण्यात आले होते.
अजित पवार १९८२ पासून बारामती तालुक्यातील राजकारणात सक्रिय झाले. त्यानंतर शरद पवार राष्ट्रीय राजकारणात स्थिरावले. साधारणत: १९९९ पासून ते जिल्हा परिषदेच्या आणि पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सत्ताकारणाचे केंद्र बिंदू झाले. ‘ऍंग्री यंग मॅन’ अशी त्यांची प्रतिमा होती. प्रशासक म्हणून त्यांनी नोकरशाही मध्ये आणि लोकप्रतिनिधींमध्येही आदरयुक्त दरारा निर्माण केला होता.
अजित पवारांच्या काही निर्णयांबद्दल, सत्ताधाऱ्यांशी असलेल्या दोन्ही राष्ट्रवादीच्या छुप्या युतीमुळे अजित पवार आणि शरद पवारही टीकाकारांचे प्रचंड धनी ठरले, पण अजित पवारांचा शेवट सर्वाचाच काळीज कुरतडणारा आहे. आयुष्यभर धावपळ करणाऱ्या अजित पवारांचे किस्से आणि आठवणी सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जमिनीशी घट्ट नाळ जुळलेला नेता.. ग्रामपंचायत ते केंद्रीय मंत्रालय सगळ्या स्तरातील प्रश्नांची उत्तम जाण असलेला नेता म्हणून ते प्रसिद्ध होते.
ग्रामीण भागातील काहीसा रांगडेपणा, स्पष्टवक्तेपणा आणि प्रसंगानुरुप विनोदबुद्धी हे त्यांचे वैशिष्ट्य त्यातून प्रकट होत आहे. राजकारणाच्या धबडग्यात असूनही ते कायम उत्साही आणि ताजेतवाने दिसत.



